Chandrapur News: थरारक रेस्क्यू: वरोऱ्याच्या आल्फर गावात ९ फुटी महाकाय मगरीचा थरार

Bhairav Diwase
वरोरा:- एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात शोभावा असा थरार वरोरा तालुक्यातील आल्फर गावात पाहायला मिळाला. शेतातील नाल्यात दबा धरून बसलेल्या ९ फुटी महाकाय मगरीने गावात चांगलीच दहशत निर्माण केली होती. घटना आहे नितेश तुरानकर यांच्या शेतातील. पाण्याने नाला भरला असताना अचानक तिथे एक मोठी मगर दिसून आली. ही मगर थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेतली.


परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तातडीने 'अपास' एनजीओच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. भर दुपारी हे ऑपरेशन सुरू झाले. पाण्यातील या मगरीला पकडण्यासाठी टीमला मोठी कसरत करावी लागली. एखाद्या सिनेमातील हिरोप्रमाणे अपास एनजीओच्या सदस्यांनी जीवाची बाजी लावून या मगरीला सापळ्यात अडकवले. हे दृश्य पाहण्यासाठी शेकडो गावकऱ्यांनी मोबाईलचे कॅमेरे सरसावले होते.


या यशस्वी मोहिमेत 'अपास' एनजीओचे विशाल मोरे, हर्षल बाकडे यांच्यासह संपूर्ण टीम आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे या टीमने आतापर्यंत पकडलेली ही नववी मगर आहे. तब्बल ९ फूट लांबीच्या या मगरीला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन वनविभागाच्या नियमांनुसार चारगाव धरणात सोडून देण्यात आले आहे.

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात जलाशयांजवळ जाताना सावध राहा आणि वन्यजीव दिसल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता तातडीने कळवा.