चंद्रपूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी; पोलिसांची कारवाई.

Bhairav Diwase
मोठ्या संख्येत आढळले पॉझिटिव्ह रुग्ण.
Bhairav Diwase. May 10, 2021
चंद्रपूर:- संचारबंदीच्या काळात विनाकारण कारणं सांगून बाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी चंद्रपूर शहर पोलीस व मनपानं एक शक्कल काढलीय. त्यानुसार आता विनाकारण फिरताना आढळणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. शहरातील कस्तूरबा चौक आणि लक्ष्मीनारायण मंदिर समोर चंद्रपूर शहर पोलिस आणि मनपा प्रशासनाकडून ही मोहीम राबवायला आजपासून सुरुवातही करण्यात आली आहे.दरम्यान,कस्तूरबा चौकात आज आतापर्यंत झालेल्या 50 चाचण्यात तब्बल 16 पॉझिटिव्ह रुग्ण तर लक्ष्मीनारायण मंदिर समोर नाकाबंदी केली असता 69 लोकांची चाचणी केली त्यामध्येही 16 जण पॉझिटिव्ह आढलून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता चंद्रपूरचा क्रमांकही वरच्या बाजुलाच आहे. शहरात रोज जवळपास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनाची साखळी तोडून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनं राज्याच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी लावण्यात आली आहे. काही सेवांना यातून सूट दिलेली असली तरी काही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या अँटिजेन चाचणी केल्या जाणार आहेत. मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी नागरिकांना विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळं तुम्ही जर चंद्रपूरात असाल तर बाहेर पडण्यापूर्वी खरंच काम महत्त्वाचं आहे का याचा विचार करा. कारण बाहेर गेल्यावर तुम्हाला चाचणीला सामोरं जावं लागू शकतं.