Top News

चंद्रपुरात रुग्णवाहिकेचे राजकारण.

डझनभर रुग्णवाहिका शोरुममध्येच धूळखात.
Bhairav Diwase. May 26, 2021
चंद्रपूर:- शनीदेव नाराज झाले तर मनुष्याचे जीवन नरकापेक्षा काही कमी नसते. कुंडलीत अडीच किंवा साडेसात वर्षांसाठी शनीचा प्रकोप होतो, अशी आख्यायिका आहे. सध्या मनुष्यजातीवर कोरोना नावाचे महाभयानक शनिकोप आले आहे. यातून सावरण्यासाठी डॉक्टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाच्या भयावह स्थितीतही केवळ निधी न मिळाल्याने रुग्णवाहिका शोरुममध्येच धूळखात आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे. मात्र, राजकीय स्वार्थ आणि कामाच्या अनास्थेमुळे रुग्णांना मृत्यूच्या दारात उभे राहावे लागत आहे. अशातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णवाहिका भेट दिल्याच्या बातम्या प्रकाशित करून घेतल्या. प्रसिद्धी मिळाली. पण, रुग्णवाहिका पोहोचल्या नाहीत. चंद्रपूर येथील नागपूर मार्गावर शनी मंदिर आहे. याच शनिमंदिरासमोर फोर्स कंपनीची शोरुम आहे. येथील मोकळ्या मैदानात रुग्णवाहिका ठेवल्या आहेत. अधिक चौकशी केली असता गौङबंगाल पुढे आले.
महाविकास आघाडीतील एका बङ्या नेत्याने घोषित केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी या रुग्णवाहिका आहेत. मोठ्या नेत्याकडून रुग्णवाहिका घोषित झाल्याने मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र कोरोणाची दुसरी लाट संपूनही या रुग्णवाहिका रुग्णसेवेत पोहोचू शकल्या नाहीत. गडचिरोली जिल्ह्यासाठी या रुग्णवाहिका असल्या तरी या चंद्रपुरातील एका शोरूम समोर त्या धूळखात पडलेल्या आहेत. या मोठ्या नेत्यांनी शोरूमचा निधी अद्याप पर्यंत जमा न केल्यामुळे त्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होऊ शकल्या नाहीत. यासोबतच एक रुग्णवाहिका चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या मतदार संघातील आहे. मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने येथे धूळखात पडलेली आहे. आज कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची मोठी गरज असतांना पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील एखादी रुग्णवाहीका अशी धूळ खात पडलेली असेल, तर काय म्हणावे? एकीकडे रुग्णवाहिकेची राजकारण करायचं आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शो रूम मध्ये महिनोंमहिने रुग्णवाहिका पङून आहेत, ही शोकांतिकाच आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने