✍️पत्रकार सुरज गोरंतवार
हि बातमी (स्टोरी) कॉपी करु नये.
वरण-भात नाही, बिस्किट नाही की चाॅकलेट नाही दुध हाच त्याचा आहार.
वहिवर रेघा ओढणे म्हणजे त्याचं शिक्षण.
शाळेला 'बेलम' व पैश्याला 'खुणाल' म्हणतो भुजंग.
पोंभूर्णा:- वरण-भात सोडा साधं बिस्किट ही न खाता कुणी फक्त दुध पिऊन जगू शकतो का..? आश्चर्य आहे नां..! पण हे सत्य आहे. जन्मापासून तर आज वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तो फक्त दुध आणि दुधच पिऊन जगतो आहे.पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील भुजंग गुरूदास मडावी हे त्या आश्चर्याचे नाव आहे गावकरी त्याला 'आऊ' म्हणतात.
भुजंगचा जन्म २३ ऑगस्ट २००५ ला जामखुर्द येथे अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या कुटुंबात झाला. वडील गुरूदास व आई सुनीता दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. साधारण जन्म झालेला भुजंग मात्र असाधरण अनुभव देत होता. भुजंगचा जन्म झाल्यानंतर तब्बल १२ दिवस त्याने आपले डोळेच उघडलेले नव्हते.शिवाय त्यांने आईचे दुधही प्याला नव्हता. कुटुंबीयांची चिंता वाढली होती. बरीच खटपट झाली शेवटी तेराव्या दिवशी भुजंगनी आपले डोळे उघडुन आईचा दुध पिला. सर्व चिंतामुक्त झाले. #Pombhurna
भुजंग सहा महिन्याचा झाल्यानंतर वरण-भात व खिचडी खाऊ घालण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण अन्नाचा एक कणही त्याने तोंडात घेतला नाही. भुक लागली की तो फक्त दुधासाठी किंचाळत असे. हा प्रकार अनेक दिवस चालला. नेमकी काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. उपचार करण्यात आले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेक तपासण्या अंती तो फिट आढळून येत होता त्यामुळे भुजंगची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी पुष्टी केली. वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्याचेवर उपचार सुरू होते. तोपर्यंत त्यांने अन्नाचा कणही तोंडात घेतला नाही. आज भुजंग १७ वर्षांचा आहे. तो अजूनही फक्त दुधच पितो. वरण- भात नाही, बिस्किट नाही कि चाॅकलेट नाही दुध हाच त्याचा आहार . एक शेर सकाळी एक शेर संध्याकाळी कधी पैसे असले की दुपारी एक शेर दुध बस हाच त्याचा आहार आहे. फक्त अर्ध्या पायली दुधावर त्याला त्याची भूक भागवावी लागते. आई वडिल मोलमजुरी करतात, मिळेल ते काम करतात पण गावखेड्यात दररोज काम मिळेल असे नसते म्हणून पैश्याच्या अभावी अनेकदा भुजंगला रात्री उपाशी पोटी झोपावे लागले आहे.
अशा विकल परस्थितीत भुजंगने ज्ञानाचे धडे गिरवले. इयत्ता पहिली ते सातवीचे शिक्षण जामखुर्द येथेच पुर्ण केले आहे. आठवी पासून तो देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात शिक्षण घेत आहे. तो यावर्षी दहावीत आहे. भुजंगचे शिक्षण म्हणजे वहिवर रेघा ओढून घेणे. शिक्षणाचा संपूर्ण सार तो आपल्या रेघांमध्ये शोधतो. मास्तराच्या प्रत्येक शिकवणीत तो ध्यानस्त बसून बघतो. भुजंगला लिहिता, वाचता, बोलता येत नाही. मात्र त्याला बोललेलं सर्व कळतं. त्याची जिभ जाड असल्याचे बोलल्या जाते. पण तो आई-बाबा, बाई, भाऊजी हे शब्द तो बरोबर बोलतो. याव्यतिरिक्त असलेले शब्द बोलतांना अडखडतो.
शाळेला 'बेलम', व पैश्याला 'खुणाल' म्हणतो. आपल्या चुलत्याला 'गागा' म्हणतो. भुजंग हरहुन्नरी आहे. तो आपल्याच धुंदीत नाचतो, त्याचे बोल समजत नाही पण तल्लीन होऊन गाणं गातो. त्याला भजनात जायला आवडते. अख्खी रात्र तो भजनात काढतो. तिथून आला की घरी भजनाचा ताल धरतो. त्याचा सुर निरागस ईश्वराशी थेट संवादच आहे हेच खरे... भुजंगची वय जशी जशी वाढत आहे तशी तशी त्याची पोटाची भूकही वाढत आहे. गरिबीने लाचार झालेल्या त्याच्या वृद्ध आई वडिलांना भुजंगचा सांभाळ कसा करायचा हा मोठा यक्ष प्रश्न उभा येऊन ठाकला आहे. पैसे नसल्याने अनेकदा भुजंग उपाशी पोटी झोपत असतो पण तो आई वडिलाकडे तक्रार करित नाही. वृद्ध आई वडिलाच्या दारिद्र्याकडे बघून हे निमुटपणे सहन करतो. वहिवर रेघा ओढून जीवनाचे कोडे सोडवणाऱ्या भुजंगला खऱ्या अर्थाने सहकार्याची गरज आहे.
"माझा मुलगा भुजंग हा लहानपणापासून दुधच पिऊन जगत आहे. आजपर्यंत अन्नाचा कणही त्याने तोंडात घेतला नाही.मुलाची वय जशी जशी वाढत आहे तशी त्याची भूकही वाढत आहे. माझ्या गरिबीमुळे त्याची गरज पुर्ण करण्यासाठी मी हतबल आहे.
गुरूदास मडावी भुजंगचे वडिल