Top News

शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी नको:- आ. सुधीर मुनगंटीवार. #Chandrapur #Maharashtra #Mumbai

मुंबई:- शिवसेना नेते अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
गीते यांच्या या विधानाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिली आहे. शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे, ही युती नकोच, असं आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. आज एक संजय राऊतांचा अपवाद जर सोडला तर राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करत असतात. पण मी हमखास सांगतो, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती....

अनंत गीते हे हृदयपासून बोलत होते. जे बोलत होते ते ऐतिहासिक सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर अशी दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली हे बघून बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती. अशा शिवसेनेसाठी मी आयुष्याचा कण आणि कण वेचला नाही असं त्यांनी सांगितलं असतं. माझी शिवसेना देव, देश आणि धर्मासाठी काम करत आली आहे, असंही ते म्हणाले असते, असं सांगतानाच परभणीचे खासदार बंडू जाधव यांचंही काही दिवसांपूर्वी त्यांचं भाष्य ऐकलं. ही आघाडी अकबर-बिरबलाच्या कहाणी सारखी आहे. वेळ आली तर आम्ही राष्ट्रवादीला पायाखाली तुडवू असं ते म्हणाले होते, याची आठवणही मुनगंटीवार यांनी करून दिली.
गीते नेमकं काय म्हणाले?

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने