Top News

राजकारण करताना समाजकारण कसे करावे, हे वैष्णवीने दाखवून दिले... #Vaishnavi #socialization #politics .

गोंडपिपरी:- ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, असे राजकीय पक्षांकडून बोलले जाते. पण एकही नेता प्रत्यक्षात तसे करताना दिसत नाही. पण भंगाराम तळोधी येथील जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार यांनी या फॉर्म्यूल्याचे उत्तम उदाहरण राजकीय नेत्यांना घालून दिले आहे. त्यांच्या थोड्याशा पुढाकाराने एका गरीब घरातील मुलगा नवोदय विद्यालयात शिकणार आहे.
आपल्या पोरानं खूप शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं ही आईवडिलांची इच्छा. पण कोरोना आला अन् सारच भंगलं. शाळा बंद झाल्या, शिक्षण थांबलं, अशातच नवोदय पात्रता परीक्षांची तारीख जाहीर झाली. गावातील शाळा बंद असल्याने नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार सरसावल्या. आपल्या घरीच त्यांनी गावातील विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले. नुकताच नवोदय परीक्षेचा निकाल हाती आला. त्यात बोडलावारांनी शिकवण दिलेला प्रेम शेरकी या विद्यार्थ्याने बाजी मारली. राजकारण करताना सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या वैष्णवी बोडलावार यांच्या या औदार्याचे आता कौतुक होत आहे.
वैष्णवी बोडलावार या भंगाराम तळोधी येथील रहिवासी आहेत. भाजपचे युवा नेते अमर बोडलावार यांच्या त्या पत्नी आहेत. स्वतः वैष्णवी बोडलावार धाबा तोहोगाव क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. एम.ए. बी.एड. पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आलं अन् सारच थांबलं. सामान्य व्यवहार ठप्प झाले. शाळा पूर्णपणे बंद राहिल्या. परिणामी विद्यार्थ्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला. अशातच जवाहर नवोदय परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. ग्रामीण भागात जवाहर परीक्षेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे गावखेडयातील अनेक पालक आपल्या मुलांना या परीक्षेत बसवितात. भंगाराम तळोधी येथील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठीचे अर्ज भरले. पण काळ कोरोनाचा असल्याने त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळू शकले नाही.
विद्यार्थ्यांची ही अवस्था बघता जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार यांनी या विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त शिक्षण देण्याचे ठरविले. आपल्या घरीच त्यांनी गावातील दहा ते बारा विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कोविडच्या काळात नियमांचे पुरेपूर पालन करीत त्यांनी शिक्षण दिले. त्या स्वतः उच्चशिक्षित असल्याने विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा झाला. नुकताच जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात बोडलावार यांच्याकडून शिक्षण घेणारा प्रेम शेरकी याने बाजी मारली. तालुक्यातून नवोदयच्या परीक्षेतून तो एकमेव उत्तीर्ण झाला. सामान्य कुटुंबातील प्रेम नवोदयची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याच्या परिवाराला मोठाच आनंद झाला आहे. त्या कुटुंबीयांना वैष्णवी बोडलावार यांचे आभार मानले आहे.
राजकारण करताना वैष्णवी बोडलावार यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग गावातील विद्यार्थ्यांसाठी केला. एका विद्यार्थ्याला मिळालेल्या यशाने त्यांचे प्रयत्न सार्थक ठरले. राजकारणात राहून सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या वैष्णवी बोडलावार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने