Click Here...👇👇👇

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांवर विकासनिधी न दिल्याने नऊ सरपंचाने व दोन सदस्यांने दाखवली नाराजी #Chandrapur

Bhairav Diwase
ब्रम्हपुरी तालुक्यात नऊ सरपंच व दोन उपसरपंचांचे काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचे राजीनामे.
चंद्रपूर:- निवडणुकीवेळी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकास कामाकरिता २५ लाख रुपये देण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन दिले होते. परंतु दिलेले आश्वासन हवेतच विरले. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. आमदार निधीतून विकास कामांना निधी मिळत नाही तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्या कामकाजावरही नाराजी व्यक्त करीत ब्रम्हपुरी तालुक्यातील व चिमूर विधानसभा क्षेत्रातील नऊ सरपंच व दोन उपसरपंचांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे काल मंगळवारी (1 डिसेंबर 2021) काँग्रेस तालुका अध्यक्षांकडे सोपविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर राजीनामे दिल्याने काँग्रेस तालुका अध्यक्षांनी सर्वच राजीनामे फेटाळून लावले आहे. या प्रकाराने राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
मागील सात-आठ वर्षांपासून ब्रम्हपुरी तालुक्यात काँग्रेसची पकड मजबूत झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यातील व चिमूर विधानसभा क्षेत्रात समाविष्ट काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामांकरिता २५ लाख रुपये देणार असल्याचे जाहीररित्या सांगितले होते.
मात्र अद्यापही ही विकासकामांकरीता लागणारा आवश्यक निधी मिळाला नाही. पालकमंत्र्यांनी घोषणा हवेत विरल्याने नऊ ग्राम पंचायतींचे सरपंच व दोन उपसरपचांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. विकासकामांना निधीच मिळत नसल्याने तसेच तालुका काँग्रेस कमिटीकडून वेळोवेळी सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करून काल मंगळवारी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्याकडे काँग्रेसच्या सदस्यत्व पदांचे सामुहिक राजीनामे सोपविले.
यामध्ये संजय राऊत (तोरगाव बु), राकेश पिलारे (कालेता), शरद अलोणे (तोरगाव खु.), सुधीर पिलारे (बेलगाव), प्रवीण बांडे (नांदगाव), सुरेश दुनेदार (पिंपळगाव), राजू नान्हे (काहाली), अर्चना डेंगे (खंडाळा), प्रेमानंद गेडाम (सोनेगाव) या नऊ सरपंचांसह नरेश राऊत (कालेता), नंदकिशोर राखडे (खंडाळा) दोन उपसरपंचांचा समावेश आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतीच्या व दोन उपसरपंचांनी टोकाची भूमिका घेऊन काँग्रेस सदस्यत्व पदाचे राजीनामे दिल्याने राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे वरील नऊ ग्राम पंचायती ह्या ब्रम्हपुरी तालुक्यात आणि चिमूर विधानसभा क्षेत्रात येतात. त्यामुळे पालकमंत्री वडेट्टीवार हे आपल्या निधितून या गावांना थेट निधी देऊ शकत नाही. त्यामुळेच स्थानिक आमदार विकासनिधीअभावी संबंधित गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत, असा आरोप केला जात आहे. सदर गावांना चिमूरचे आमदार भांगडिया यांचे निधीतून विकास कामाकरीता आपल्या क्षेत्रातील गावे म्हणून निधी मिळणे आवश्यक आहे. परंतु तसे न होता आपल्याच पक्षाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांचेविरोधात उघडपणे ही नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही नाराजी ऐन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असतानाच उघड केल्याने राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी, या नऊ गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी इतर शासकीय विकासनिधीतून कामे मंजूर करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, राज्याकडून विकासनिधी देण्यास विलंब होत आहे. त्याचे एकमेव कारण हे कोरोनाचा संकटकाळ आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. तसेच ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी हे ब्रम्हपुरी व चिमुर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील सर्व गावांमधील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करीत असतात. तालुका काँग्रेस कमिटीकडे काम घेऊन येणारे ग्रामस्थ हे कधीच निराश होऊन परतत नाहीत. त्यामुळे त्या ९ गावांतील सरपंचांनी दिलेले पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका काॅंग्रेस कमिटीने फेटाळले आहेत.
खेमराज तिडके तालुकाध्यक्ष,
काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी