आमदारांकडून गडचांदुरकरांची निराशाच... #Korpana

Bhairav Diwase
प्रदूषणाचा मुद्दा सभागृहात मांडलाच नाही
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहरातील नागरिकांना माणिकगड कंपनीच्या प्रदूषणामुळे रोगराई व डस्टच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत माणिकगड कंपनीने डस्ट कलेक्टर मशीन व इएसपी यंत्रणा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू असताना विधानसभेत हा प्रश्न चर्चेला जाईल असे वाटले. कारण गडचांदूर येथील अनेक सजग नागरिकांनी मा. लोकप्रतिनिधी यांना होत असलेल्या प्रदूषण व गंभीर त्रासाबद्दल अवगत केले होते. आमचे दुर्दैव असे की, इतका तातडीचा प्रश्न असून देखील आमच्या लोकप्रतिनिधीने तो सभागृहात मांडला नाही.
जो पर्यंत विधायक मार्गाने प्रश्नाला वाचा फुटणार नाही तोपर्यंत माणिकगड प्रशासन मुजोरी थांबणार नाही. मात्र स्थानिक नेत्यांच्या पाठबळ असल्यामुळे ही कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी बिनधोक खेळत आहे.
एका बाजूने प्रदुषण विरोधात आवाज उचलायचा आणि दुसऱ्या बाजूने आपला आवाज न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीचा प्रचार व प्रसार करायचा यातच नागरिकांचे अहित आहे. मुळात कंपनीच्या युनिट २ ला ना हरकत देण्यासाठी त्यावेळच्या ग्रामपंचायतीने ठराव पारित केला होता त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. गावाच्या विकासासाठी कंपनीला कोणत्याही अटी वा शर्ती लागू दिल्या नाही त्या वेळेस जर अटी शर्ती सत्ताधार्यांनी ठेवल्या असत्या तर गावतील अनेक कामे झाली असती व प्रदूषण सुद्धा कमी झाले असते.
तसेच युनिट २ कार्यान्वित होताना सद्याचे आमदार हेच त्यावेळी आमदार होते त्यामुळे जो पर्यंत आमदार साहेब प्रश्न मांडणार नाही तो पर्यंत नागरिकांचा प्रश्न सुटेल कसा आणि प्रदूषण नियंत्रण होईल कसे असा प्रश्न नागरीक विचारू लागले आहे.