गडचिरोलीत नक्षलविरोधी मोठी कारवाई

Bhairav Diwase
गडचिरोलीत माओवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणारी टोळी जेरबंद 
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि जंगल परिसरात माओवादी आणि भारतीय जवानांमध्ये सतत चकमकी घडत असतात. अशा माओवाद्यांना स्फोटक निर्मिती साहित्यांचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी चार जणांना ताब्या घेतलं आहे. एक आरोपी फरार असून गडचिरोली पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. राजू गोपाल सल्ला (31 रा. करीमनगर, तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (24 अहेरी-गडचिरोली), साधू लच्चा तलांडी (वय 30), मोहम्मद कासीम शादुल्ला (करीमनगर, तेलंगणा) असं अटक केलेल्या चौघांची नावं आहेत.
तर छोटू ऊर्फ सिनू मुल्ला गावडे हा आरोपी मौजा भंगारामपेठा अहेरी येथील रहिवासी असून तो सध्या फरार आहे. गडचिरोली पोलिसांकडून याचा कसून शोध घेतला जात आहे. हिंसक कारवायात वापरण्यात येणारे बी जी एल तसेच हॅंडग्रेनेड आणि बॉम्ब तयार करण्यासाठी कार्ड एक्स वायर अतिमहत्त्वाची असते. या कार्डेक्स वायरचे 3 हजार 500 मीटर लांबीचे दहा बंडल माओवाद्यांना पुरवठा होणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे दामरंचा पोलीस ठाण्याच्या पार्टी व शीघ्र कृती दल (क्युआरटी) जवानांनी कारवाई करत मौजा भंगारामपेठा गावातून चार जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 3 हजार 500 मीटर लांबीची कार्डेक्स वायर असलेले दहा बंडल जप्त केले आहेत.
खरंतर सुरक्षा दलाच्या विरोधात हिंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांना स्फोटकांची गरज भासत असते. या माओवाद्यांना विविध ठिकाणाहून छुप्या पद्धतीने स्फोटक निर्मितीसाठी साहित्याचा पुरवठा केला जातो. संबंधित टोळी भंगाराम पेटा या गावातून संबंधित साहित्य घेऊन माओवाद्यांना देण्यासाठी जात होती. यावेळी दामरंचा पोलीस ठाण्यातील जवानांनी सापळा रचून चार जणांना अटक केली आहे. चारही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. यामधून आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली.