पुणे:- मागील अनेक दिवसांपासून दहावी, बारावीची परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे.
बारावीची लेखी परिक्षा ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान ऑफलाईन होणार आहे. तसेच प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार असून तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत होणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल.
तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर कोरोनामुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर त्या विद्यार्थ्याला स्वतंत्र्य कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. तसेच नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत आवश्यक ती वैद्यकीयमदत पुरवली जाईल.
दरम्यान, परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त २५ विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. तसेच प्रॅक्टिकल परीक्षेसाठी ज्या त्या शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परीक्षक म्हणून काम करतील.