Top News

पोंभूर्णा शहरातील घरकुल लाभार्थांना तत्काळ योजनेचा लाभ द्या #pombhurna

शिवसेनेचे विरोधी पक्षनेते तथा गटनेता आशिष कावटवार यांची मागणी

रमाई आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल योजना च्या लाभार्थ्यांना ताटकळत ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी
पोंभुर्णा:- दारिद्र रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबांना शासनाकडून पक्के घर बांधण्याकरिता विविध योजनेतून निधी देण्यात येतो. लाभार्थ्‍यांना हा निधी तीन ते चार टप्प्यात दिला जातो. मात्र नगरपंचायत पोंभूर्णा येथील लाभ घेणाऱ्या रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी या योजनेपासून लाभ मिळूनही पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने त्यांची सर्वांची कामे रखडली आहेत. अनेक लाभार्थी उघड्यावर पडले आहेत. राहते घर पडल्यामुळे आता राहायचे कुठे म्हणून शेजारीच झोपडी तयार करून अनेक जण वास्तव्य करीत आहेत.
पोंभूर्णा शहरातील या योजनेमध्ये नागरिकांना 2 करोड 52 लक्ष रुपये व रमाई आवास योजनेची निधीही गेल्या वर्षाभरापासुन प्राप्त झाली. मात्र किरकोळ कारणे दाखवून लाभार्थ्यांना मागील तीन ते चार वर्षापासून घरकुल देण्यापासून वंचित ठेवलेले आहे.
लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी वारंवार पैशाची मागणी केली जाते.व वारंवार नकाशा बदलचे कारण समोर करून टोलवाटोलवी केली जात आहे. अधिकारी- कर्मचारी बदलत जातात तर कायदयात बदल होतो का असा आरोप गटनेता आशिष कावटवार यांनी आपल्या निवेदनातून केला आहे.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व अभियंता वारंवार अनुपस्थित राहतात त्यामुळे अनेक योजनांची कामे नियोजित वेळी होत नसल्यामुळे लोकांची कामेही खोळंबलेली आहेत. या कामा संबंधात कार्यरत असलेला अभियंता वारंवार बदलत असल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यांच्या अशा दुर्लक्षामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. असेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा विरोधी पक्षनेता तथा गटनेते आशिष कावटवार यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने