Top News

महाकाली यात्रा कालावधीत चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल #chandrapur


नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर:- जिल्ह्यात 7 एप्रिलपासून महाकाली यात्रेला सुरुवात होत आहे. कोविड-19 प्रतिबंधात्मक नियम शिथील करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्रा सुखरूप व सुरक्षित पार पाडावी यादृष्टीने तसेच सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था व यात्रेदरम्यान रहदारीस कुठलाही त्रास अथवा अडथळा होऊ नये, याकरीता महाराष्ट्र पोलिस अधिनियम-1951 कलम 33 (1) अन्वये दि. 7 एप्रिल ते 20 एप्रिल 2022 पर्यंत जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.
अशी असेल यात्रा कालावधीत शहरातील वाहतुक व्यवस्था

यात्रा कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद करण्यात येत आहे. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापुर वॉर्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यास किंवा घरी परतण्यास भिवापुर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराच्या बाहेर जाण्याकरिता वाहनधारकांनी बायपास रोडचा उपयोग करावा.
चंद्रपूर शहरातील रामाळा तलावमार्गे जटपुरा गेटकडे येणारी वाहने, जटपुरा गेटबाहेर फुटक्या किल्ल्यातून विरुद्ध दिशेने न जाता मौलाना चौकातून, आझाद बगीचाच्या बाजूच्या लिंक रोडने, जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपुरा गेटमधून बाहेर जातील. यात्रेकरीता येणाऱ्या भाविकांनी तसेच शहरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने