Top News

रेती माफियाचा तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला #attack

भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना मारण्यासाठी त्यांच्या गाडीला तस्करीच्या ट्रॅक्टरने मागाहून जोरदार धडक दिली. या प्राणघातक हल्ल्यात तहसीलदार यांचे वाहन सुमारे २० फूट अंतरापर्यंत फरफटत गेले. ही घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. धडक एवढी गंभीर होती, की या घटनेची माहिती मिळताच शेगाव व भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यात तहसीलदार डॉ. अनिकेत सोनवणे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. सहकारी नायब तहसीलदार शंकर भांदककर, विलोडाचे तलाठी कैलास पुसनाके, तलाठी श्रीकांत गीते सुदैवाने बचावले.
विलास पांडुरंग भागवत (४o) रा. चंदनखेडा असे ट्रॅक्टरचालक- मालक आरोपीचे नाव आहे. तो टॅक्टरने (क्रमांक एम एच ३४ बी जी २३४३) रेती घाटावरून रेती चोरून नेत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार डॉ. सोनवणे यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनांनी चंदनखेडा परिसर कारवाईसाठी गाठले. तेव्हा त्यांनी चालकाला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले.
चालकाने ट्रॅक्टर थांबविले. त्यानंतर ट्रॅक्टरचालक व मजुरांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर स्वतः विलास भागवत याने ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेऊन तहसीलदारांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. यात ते वाहन २० फुटापर्यंत फरफटत गेले. यात तहसीलदार यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायब तहसीलदार शंकर भांदककर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास भागवत याला अटक केली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने