Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भटकलेल्या चितळाला वन्यजीव प्रेमींनी सोडले जंगलात #chandrapur #bhadrawati

भद्रावती:- जंगलातून नागरी वस्तीकडे भटकत आलेल्या चितळाला भद्रावती शहरातील वन्यजीव प्रेमींनी पकडून सुरक्षित जंगलात सोडल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि.२६ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान येथील आयुध निर्माणीच्या मुख्य दारातून एक चितळ भद्रावती शहरात भटकत आल्याची माहिती येथील काही नागरिकांनी स्थानिक वन्यजीव प्रेमींना देण्यात आली. त्यानुसार वन्यजीव प्रेमी त्या चितळाचा शोध घेत असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास आशिष वाकडे यांच्या घरात सदर चितळ आढळून आला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्डचे सदस्य अनुप येरने आणि नेफडो चे उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चितळाला व्यवस्थित पकडून आयुध निर्माणीच्या जंगलात सुखरूप सोडले.
यावेळी घटनास्थळी वनविभागाचे वनमजुर, प्रतीक धानोरकर, अद्वैत राऊत, रोहित स्वान मदतनीस म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, पुरामुळे वन्यप्राणी आता मानवी वस्तीकडे भटकू लागले असून याची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. सदर चितळाला आयुध निर्माणीच्या जंगलात सोडल्यानंतर परत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भद्रावती शहरातील मानोरा फाट्यावर दोन चितळ आढळून आले. या दोन्ही चितळांना हौशी नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तसेच तालुक्यातील चारगांव परिसरात तीन पट्टेदार वाघांचे दर्शन गावकऱ्यांना होत असून तीन गुरांना ठार करण्याची घटना नुकतीच घडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत