💻

💻

१७ वर्षीय रुग्णाला वाचवण्यासाठी ठाणेदार बनले नावाडी तर तहसीलदारांनी घनदाट जंगलातून आणली रुग्णवाहिका #chandrapur #gondpipari #Kothari

चंद्रपूर: आपत्कालीन परिस्थितीत एकाही रुग्णाचा उपचाराअभावी जीव जावू नये यासाठी गोंडपिपरीचे तहसीलदार के.डी.मेश्राम व कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण या संवेदनशिल अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिकाऱ्यांच्या संवेदनशिलतेमुळे १७ वर्षीय मुलाचा जीव वाचला. शासकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यापलिकडे जाऊन कार्य केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सिध्द करून दाखविले.
मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव या गावाला चारही बाजूने पूराने वेढले असून बेटाचे स्वरूप आले आहे. अशातच तोहोगावातील साहील वाघाडे (१७) याला मेंदूज्वर झाला. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
गावाच्या चहूबाजूने पाणीच पाणी, आता जायचं कस, हा मोठा प्रश्न वाघाडे कुटुंबीयांसमाेर होता. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मेश्राम आणि कोठारीचे ठाणेदार चव्हाण “देवदुता”सारखे धाऊन आले. मेश्राम यांनी रुग्णवाहिका घेऊन जंगलातील कन्हाळगाव मार्गे तोहोगाव परिसर गाठण्याचे ठरविले. मात्र, वाटेत घनदाट जंगलात भलेमोठ्ठे झाड आडवे पडून असल्याने वाहन पुढे जाऊ शकले नाही. मुलाची प्रकृती खालावत असल्याने कुटु़ंबीयांची चिंता वाढली. अशा संकटाच्या परिस्थितीत कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण पुढे आले. त्यांनी नावेने गाव गाठले आणि रुग्णाला चार नंबर जंगलात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहचविले. साहिलाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुरामुळे गोंडपिपरी तालुक्याचे बेहाल झाले आहे. अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तहसीलदार मेश्राम व ठाणेदार चव्हाण यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि कार्यतत्परता सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रशासनात असे संवेदनशिल अधिकारी असल्यास एकाही रुग्णाचा उपचाराअभावी जीव जाणार नाही, याची खात्री आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत