लाच मागणार्‍या महिला तलाठ्यावर कारवाई #chandrapur #Rajura

Bhairav Diwase

राजुरा तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- शेतीचे फेरफार करण्याकरिता 20 हजार रुपयांची लाच मागणार्‍या सास्ती साज्यातील तलाठी दीपाली भडके यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर चमूने कारवाई केली असून, चौकशी करिता ताब्यात घेतले आहे.
पुरुष तक्रारदाराने सास्ती साज्यातील त्यांच्या शेतीच्या फेरफार संदर्भात आवश्यक कागदपत्राकरिता 13 मे 2022 ला अर्ज दिला होता. अर्ज दिल्यानंतर एकवीस दिवसात फेरफार देणे आवश्यक असताना मुद्दाम वेगवेगळी कारणे देत फेरफार करण्यास आरोपी दीपाली भडके टाळाटाळ करीत होत्या. 20 हजार रुपये मिळणार नाही तोपर्यंत फेरफार देण्यास त्यांनी नकार दिला. अशी तक्रारदाराने चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात तक्रार दिली. सोमवारला भडके यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दुपारपासून राजूरा पोलिस ठाण्यामध्ये चौकशी सुरू असून, वृत्त लिहेपर्यंत अटक करण्यात आली नव्हती.
राजुरा तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असून, महसूल विभागात खळबळ माजली आहे.