ग्रामपंचायत कार्यालयात टेबलच्या ड्रॉवरमध्ये साप #snakenews #snake

Bhairav Diwase

तरुणी थोडक्यात बचावली
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा ‌:- आपण कार्यालयात खुर्ची वर बसून टेबल वर काम करीत आहात आणि एवढ्यात काही वस्तू काढण्यासाठी टेबल चा ड्रॉवर उघडला आणि अशा बेसावध क्षणी एकाएकी सापाचे दर्शन झाले तर आपली अवस्था काय होईल. असाच प्रसंग ओढवला आहे राजुरा तालुक्यातील सिंधी या गावाच्या संगणक चालक तरुणी वर. मात्र तीने प्रसंगावधान राखून तातडीने त्यापासून दूर होत गावकऱ्यांना बोलवीले आणि त्यांनी सापाला बाहेर काढले. यामुळे ही संगणक चालक तरुणी मात्र चांगलीच घाबरून गेली.
राजुरा तालुक्यातील सिंधी या गावात ही घटना घडली. सध्या सिंधी या गावाचा वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे राजुरा तालुका मुख्यालयाशी तसेच वरुर स्टेशन या परिसरातील मुख्य गावापासून संपर्क तुटला आहे. पूर असल्यामुळे ग्रामसेविका योगिता चिताडे गावात येऊ शकल्या नाही. सिंधी येथील संगणक चालक कु. हर्षाली हनुमंत दरेकर या कार्यालयीन कार्य करण्यासाठी सिंधी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या. तिथे संगणकाचे काही काम केल्यानंतर त्यांना ड्रॉवर मधील काही कागदपत्रांची आवश्यकता भासली. त्यांनी ड्रॉवर उघडुन काही कागदसुद्धा काढले. मात्र त्यावेळी याच ड्रॉवर मध्ये सर्पराज आहेत, याची पुसटशीही कल्पना हर्षालीला आली नाही. तीने तिसऱ्या वेळी ड्रॉवर मध्ये हात घालतच साप दृष्टीस पडला. त्वरित तीने प्रसंगावधान राखून तातडीने बाहेर आली आणि ग्रामपंचायत चपराशी व गावकऱ्यांना बोलविले. सिंधी येथील सर्पमित्र गावी नसल्याने आणि राजुरा रस्ता बंद असल्याने गावकऱ्यांनीच सापाला बाहेर काढले.
जीवनदीप पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लांडे आणि सर्पमित्र विजय पचारे यांनी या सपाविषयी माहिती देताना सांगितले की, हा कॉमन कॅट स्नेक असून याला स्थानिक भाषेत मांजऱ्या साप म्हणतात. हा साप निमविषारी असून राजुरा तालुक्यात दुर्मिळ आहे. या सापाचे वास्तव्य साधारणतः झाडावर असते. सरडा, पाली, लहान पक्षी व त्यांची अंडी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. या जातीचा साप तालुक्यात केवळ पाच वेळा सापडल्याची नोंद असल्याची माहिती जीवनदीप संस्थेच्या सर्पमित्रांनी दिली.