महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मत मिळाली.
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.