Top News

113 गावात साजरा झाला दारूमुक्त पोळा #chandrapur #gadchiroli #pola


गडचिरोली:- मुक्तिपथ गावसंघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 113 गावात दारूमुक्त पोळा साजरा करण्यात आला. पोळ्याच्या सणाला गावांमध्ये दारू काढली आणि प्राशन केली जाते.
अनेक दिवसांपासून बंद ठेवलेली दारू पोळ्याच्या निमित्याने पुन्हा सुरु होण्याची शक्यता असते. यामुळे सणाच्या उत्सवावर विरजण पडत असते. ही बाब लक्षात घेऊन मुक्तिपथ, गाव संघटनाच्या पुढाकारातून जिल्हयात दारूमुक्त पोळ्याचे आवाहन दरवर्षी करण्यात येते. यानुसार यंदाही गावागावात दारूमुक्त पोळा साजरा करण्यात आला.
बैलपोळा हा सण शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण असतो. बैल पूजा करून पारंपारिक वाद्यांच्या तालावर त्याची गावातून मिरवणूक काढली जाते. गावात उत्साहाचे वातावरण असते. पण पोळ्याच्या सणाला दारू आणि जुगार ही परंपरा काही गावात असल्याने मद्यपी दारूच्या नशेत सणाचे पावित्र्य भंग करीत असतात. महिलांना दारूमुळे त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे गावातील शांतता भंग होऊन वातावरण खराब होते. यासाठी गावागावात दारूमुक्त पोळा साजरा होण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमूतर्फे गावागावात बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांमध्ये गावकर्‍यांशी चर्चा करण्यात आली. विविध ठिकाणी दारूचे दुष्परिणाम पटवून देत दारूमुक्त पोळा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यालाच प्रतिसाद देत 'दारूमुक्त पोळा' हा उपक्रम गावागावात साजरा केला गेला.
गाव संघटनेच्या पुढाकारातून विविध तालुक्यातील विविध गावांमध्ये दारूमुक्त पोळ्याची अंमलबजावणी विविध पद्धतीने करण्यात आली. गावात बॅनर लावून, व्यसनाच्या विषयावर झडत्या म्हणून, बैलाच्या पाठीवर, दारू सोडा संसार जोडा असे संदेश लिहत. गावात फेरी काढून घोषणा देत अशा विविध पद्धतीने दारूमुक्त पोळा सण विविध गावात साजरा करण्यात आला. या स्त्युत्य उपक्रमामुळे दारू विक्री बंद असलेल्या गावांतील दारूबंदी कायम ठेवण्यास मदत झाली. यानंतर या आवाहनाला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला.
जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर, फरी, कसारी, बोळधा, आमगाव, चिखली रिठ, डोंगरमेंढा, अहेरी तालुक्यातील जामगाव, चिंतलपेठ, खमणचेरु, तानबोडी, नागेपल्ली, गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला, भिकारमौशी, नवरगाव, रानमुल, अमिर्झा, बेलगाव, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली, गेदा, बुरगी, कांदोळी, मवेली, मरकल, तुमरगुंडा, उडेरा, मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली, आंबटपल्ली, चिचेला, कोडीगाव, कोठारी, कोलपल्ली व मुलचेरा, भामरागड तालुक्यातील हेमलकसा, मेडपल्ली, राणीपोदुर, ताडगाव, चामोर्शी तालुक्यातील मारोडा, मूरखळा माल, धानोरा तालुक्यातील लेखा, मिचगाव, कन्हारटोला, बोरी, कटेझरी, दूधमाळा, कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर, नवरगाव, आंधळी, सोनेरांगी, खरकाडा, शिरपूर, कुंभीटोला, हेटीनगर, उराडी, कोरची तालुक्यातील जांभळी, बोटेकसा, बिहीटेकला, बिहटेखुर्द, बोलेना, बेडगाव, झंकारगोंदी व भरीटोला याशिवाय जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये दारूमुक्त पोळा साजरा केला गेला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने