Top News

सर्वसामान्याशी नाळ जुळविणाऱ्या अधिकारी डॉ. मिताली सेठी मॅडम #chandrapur


जि. प. चंद्रपूरच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा यशस्वी प्रवासाची यशोगाथा

विद्यार्थी व युवकांना दिशादर्शक.

वैद्यकीय पेशात असणाऱ्या व रुग्णांशी अतूट नातं असतांना देखील अखेर जिद्दीच्या, अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत येऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याला अग्रक्रम देण्यात यशस्वी ठरणाऱ्या महिला अधिकारी आहेत.
त्यांचा जन्म पंजाब राज्यातील जालंधर येथे एका सामान्य कुटूंबात झाला.बालपणापासून शिक्षणाची आवड व समाजसेवेच्या ध्यास असल्याने प्राथ.व माध्यमिक शिक्षणानंतर सुवर्ण मंदिर म्हणून ओळख असलेल्या अमृतसर येथून त्यांनी बैचरल ऑफ डेंटल सर्जरी (BDS) ची पदवी घेतली त्यानंतर चेन्नई येथील मेडिकल कॉलेजमध्ये डेंटल सर्जरी पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर शिक्षण केले.डॉक्टरी पेशात रममाण असतांना महाराष्ट्रातील आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात युवा शिबिरात असतांना स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले.डॉ.अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की,"झोपेत असतांना पडलेले स्वप्न नकोत तर जी स्वप्न आपली झोप उडवितात त्या स्वप्नांचा पाठलाग करायला हवा" त्याचप्रमाणे घरचा विरोध असून देखील स्पर्धा परीक्षेच्या तयारी करू लागल्या.अतिशय सर्जनशील,प्रयोगशील व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.मिताली सेठी यांनी पूर्व परीक्षा दिली पण दोनदा पूर्व परीक्षा पास होऊ शकल्या नाही तरीदेखील अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.अपयशात यश लपलेलं आहे हे स्वतःला समजावून तिसऱ्या वेळेस निराश,उदास न होता अभ्यासात सातत्य,जिद्द,चिकाटी ठेवत भारतातून ५६ वी रँक घेऊन आय.ए. एस. मध्ये महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी बनल्या.
२०१७ मध्ये आय.ए. एस बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी प्रथमतः विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट (चिखलदरा व धारणी) या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) येथे प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाल्या.आदिवासी भागात नाना समस्या असतांना देखील कोरोनाने डोके वर काढले.कोरोना ही जागतिक महामारी आणि आदिवासींच्या मनात असलेली नाहक भीती,गैरसमज,आरोग्य,पोषण यासारख्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी अधिकारी म्हणून गावोगावी जाऊन जनजागृतीचे कार्य करू लागल्या.मेळघाट हे क्षेत्र सहसा समस्येचे माहेरघर म्हटले तर चुकीचं ठरणार नाहीच पण अश्या ठिकाणी देखील सकारात्मक विचार ठेऊन पेशाने डॉक्टर असणाऱ्या मॅडमनी आरोग्य आणि पोषणावर अधिक भर दिला.संवादाची होत असलेली अडचण बघता कोरकू भाषा देखील अवगत केली.शासनाच्या प्रत्येक योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहचण्यासाठी कल्पक व्हिडीओ बनवून समाजमाध्यमावर अपलोड करीत असत त्यामुळे जनतेच्या मनातील अधिकारी झाल्या.अजूनही काही गावात जाण्यासाठी रस्ता नाही अश्या वेळी रो.ह.योजनेअंतर्गत पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून निधी मिळवून दिला.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर तिसऱ्या लाटेत लसीकरण घेण्यासाठी कोणीही पुढे धजावत नव्हते तेव्हा प्रथम सरपंच व सदस्य,अधिकारी,कर्मचारी यांचे लसीकरण करून इतरांना प्रोत्साहित करण्याचे काम केले.प्रत्येक गावात 'लसीकरण कॅम्प' बसविण्यात आले आणि सर्वसामान्यांच्या मनात असलेले लसीबाबत गैरसमज दूर करण्यास यशस्वी ठरल्या त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्यांशी नाळ जोडून ठेवणाऱ्या अधिकारी ठरल्या.
मेळघाट मध्ये सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्य करीत असतांना आदिवासी क्षेत्रात गर्भवती महिला,स्तनदा माता,कुपोषित बालके,सकस आहाराची अनुपलब्धता यामुळे होणारे आजार व समस्या यासाठी 'मूल जाईल तिथे अन्नाचा घास' पोहचला पाहिजे असा आग्रह त्यांनी ठेवला.स्थलांतरित झालेली व्यक्ती,कुटुंब,बालके यांची माहिती त्वरित कळावी यासाठी महिला बालकल्याण खात्याने जिजाऊ माता मिशन अंतर्गत माय ग्रँट ट्रॅकिंग सिस्टीम (MTS) नावाचे ऍप विकसित करण्यात आले.त्याचसोबत नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी टोल फ्री नंबर देण्यात आला.डॉ.मिताली सेठी मॅडम यांनी आपल्या कल्पक सृजनशील विचारातून डिजिटल तंत्रज्ञान वापरून समस्या सोडविण्याचा आग्रही प्रयत्न असल्याने लोकांच्या गळ्यातील ताईत ठरल्या.
डॉ.मिताली मॅडम यांची काम करण्याची कार्यशैली,कल्पक योजना,प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून ओळख मेळघाटात आहे.मेळघाटातून बदलीने चंद्रपूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्यभार घेतलेला आहे.जिल्हा परिषदच्या प्रमुख या नात्याने पालक,शिक्षक,विद्यार्थी,अधिकारी व कर्मचाऱ्यात समन्वय ठेऊन कार्य पूर्णत्वास नेण्याचा ठसा देखील इथे उमटविला आहे.प्रथमतः समस्या निवारण सभेमध्ये शिक्षकांच्या समस्या स्वतःची समस्या म्हणून लेखी नोंदी ठेऊन शक्य तेवढ्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले त्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव मी घेतला आहे.प्रत्येक मूल शाळेत टिकला पाहिजे,शिकला पाहिजे यासाठी शिक्षकांशी प्रेमपूर्वक वर्तन असते.ग्रामीण भागातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचे विद्यार्थी हेरून प्रावीण्यप्राप्त मिळवून घेण्यासाठी 'मिशन गरुडझेप' नावाचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे.तसेच डायटचे प्राचार्य मा. धनंजय चापले,प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. दिपेंद्र लोखंडे,माध्य.शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांच्या सहकार्याने मिशन गरुडझेप ची झेप भरारी घेत आहे.मिशन गरुडझेप अंतर्गत पालक संवाद असो वा विद्यार्थी,शिक्षक यांचे काव्यवाचन यात अग्रेसर आहे.विविध स्पर्धा या माध्यमातून पार पाडण्याची प्रमुख भूमिका असते.
शिक्षक,पालक,समाज,स्वयंसेवी संस्था,विद्यार्थी यांचे समाजाभिमुख, लोकाभिमुख लेख 'मुक्तांगण' या डिजिटल ब्लॉगवर उपलब्ध करून दिले आहे.शैक्षणिक वातावरण निर्मिती करून आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे हाच आग्रह सदैव मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमुख या नात्याने मॅडमचा असतो.
चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्य करीत असतांना सक्षम कार्यालय निर्माण करण्यासाठी प्रभावशाली टपाल आज्ञावली व फाईल ट्रॅकिंग सिस्टीम निर्माण केली आहे. सक्षम कार्यालय निर्माण करण्यासाठी व जनतेच्या,शिक्षकांच्या समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान होण्यासाठी फाईल ट्रॅकिंग सिस्टीम चा उपयोग होणार आहे.निवेदन कर्त्याला संगणकीकृत पावती मिळणार असून विहित मुदतीत काम पूर्ण व्हायला हवे अन्यथा दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर,लिपिकांवर कार्यवाही करण्यात येईल असे सूतोवाच करण्यात आले.जेणेकरून लांबून येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रक्रम दिलेला असून आपली फाईल कोणत्या ठिकाणी आहे याचा देखील अंदाज फाईल इंडेक्स नंबर वरून पाहू शकतो. असा पथदर्शी,पारदर्शक कार्य जिल्हा परिषद मध्ये घडत असल्याचा आनंद मिळतो आहे.चंद्रपूर जिल्हा परिषद साठी वेगळी वेबसाईट तयार केली असून दिव्यांग लोकांच्या गरजा,तक्रार, समस्या सोडवण्यासाठी डिजिटल व्यासपीठ निर्माण केले आहे.प्रत्येक लहान-सहान बाबीकडे स्वतः डॉ.मिताली सेठी मॅडम जातीने लक्ष देत असल्याने सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत ठरल्या हे मात्र विशेष!!!!

✒️ दुशांत बाबुराव निमकर
जि. प.उच्च प्राथमिक शाळा,भंगाराम तळोधी
ता.गोंडपीपरी जिल्हा चंद्रपूर
    मो न ९८३४२३६८२४

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने