💻

💻

आरोग्य सेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात #chandrapur

चंद्रपूर:- पंचायत समिती चामोर्शी येथील आरोग्य सेवक रामचंद्र पाटेवार (४७) लाच रक्कम स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. रामचंद्र पाटेवार यांचे विरूध्द तडजोडअंती ३ हजार ५०० लाच रक्कमेची मागणी केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन्वे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्याच्या कामाकरीता ४ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करुन पंचसाक्षीदारा समक्ष तडजोडीअंती ३ हजार ५०० लाच रक्कमेची सुस्पष्ट मागणी झाली. मात्र तक्रारदाराला लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि यांच्याकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा करून सापळा रचत पंचायत समिती चामोर्शी येथील कार्यालयात ३ हजार ५०० रु. लाच रक्कम स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सदर प्रकरणी लाचखोर रामचंद्र पाटेवार यांच्यावर पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन्वे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पो.नि श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, ना.पो.शि किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, संदिप घोरमोडे, संदिप उडाण, म.पो.शि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत