बसस्थानक परिसरात आढळलं पाेतं #gadchiroli

Bhairav Diwase

पाेलिसांमुळं २१ कासवांना मिळालं जीवदान
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाच्या सतर्कतेमुळे सुमारे २१ कासवांना जीवदान मिळाले. ही कासवे विक्रीसाठी नेली जात होती.
यंदा २८ जुलै ते तीन ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. त्या अनुषंगाने सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक गस्तीवर होते. त्यांना स्थानिक बसस्थानकाच्या परिसरात एक पोते बेवारस स्थितीत पडून दिसले.
याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दक्षता बाळगून पाहणी केली असता त्यात २१ जिवंत कासवं आढळून आली. ही बाब वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू यांना माहिती देण्यात आली. कटकू यांनी आपल्या चमूसह दाखल होऊन ती कासवे भरलेले पोते ताब्यात घेतले.
पाहणी केल्यावर कासवाच्या तोंडाला आकडे (गळ) लटकून असल्याचे लक्षात आले. मासेमारी करताना ही कासवे गळाला लागली असावीत, असा अंदाज आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व कासवांच्या तोंडातील आकडे काढून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर कासवांना प्राणहिता नदीत सोडण्यात आले. हे पोते कोण आणि कुठे घेऊन जात होते, याचा शोध वनविभाग करत आहे.