Top News

अखेर जुन्या चिट्ठीने केला उलगडा; प्रेमात धोका मिळाल्याने तरुणीची आत्महत्या #suicide


गडचिरोली:- त्यांचे एकमेकावर प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाकाही झाल्या. पण त्याने काही दिवसातच तिला टाळणे सुरू केले. एवढेच नाही तर शिवीगाळ करून मारहाणही केली. यामुळे प्रेमभंगाच्या दु:खात त्या युवतीने गळफास लावून घेतला.
गेल्या १० ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण घरात दोन महिन्यांपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आणि युवतीच्या आत्महत्येचे खरे कारण पुढे आले. अखेर पोलिसांनी प्रियकरावर मृत्यूला कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील युवती ही चामोर्शीच्या गणेश नगरातील तर प्रियकर घोट येथील रहिवासी आहे. त्याचे नाव सौरभ अधिकारी असे आहे. संबंधित युवती दोन-तीन वर्षांपासून नागपूर येथे शिक्षण घेत असताना विद्या बजाज कंपनीमध्ये पार्टटाईम जॉब करत होती. तिला नीट परीक्षेची तयारी करायची असल्यामुळे जून २०२२मध्ये ती चामोर्शी येथील घरी आली होती. १७ जुलै रोजी तिने 'नीट'ची परीक्षा दिली. पण ती नागपूरवरून आल्यापासून तणावात असल्याचे दिसून येत होते. आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने आपल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले. पण सौरभ आता लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याने तणावात असल्याचे सांगितले.
दरम्यान, २ ऑगस्ट रोजी राहत्या घरी तिने गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अखेर उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात मुलीच्या आईने गडचिरोली पोलीस ठाण्यात तोंडी माहिती दिली.

-अन् चिठ्ठीने मिळाला पुरावा

१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी युवतीच्या आईला घरातील बेडरूममध्ये साफसफाई करताना गादीखाली एक चिठ्ठी सापडली. १४ जून रोजी लिहिलेल्या त्या चिठ्ठीमध्ये हिंदी, बंगाली भाषेचे लिखाण केले होेते. त्यात सौरभ अधिकारी यांनी खूप मानसिक त्रास दिला असून, प्रेमसंबंध असताना शिवीगाळ करून धमकी देऊन मारहाण केली आहे. तो माझ्याशी लग्न करणार नसल्यामुळे मला जीवन जगणे असह्य झाले आहे, असा मजकूर होता. युवतीच्या आईने ही चिठ्ठी पोलिसात दिल्यानंतर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या सौरभ अधिकारीविरूद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने