चंद्रपूर:- जिवापाड जपलेल्या पोटच्या गोळ्याला हृदयरोग झाल्याचे तपासणी आढळल्यानंतर उपचारासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला होता. अशावेळी चंद्रपुरातील श्री माता कन्यका सेवा संस्था मदतीला धावून आली. चंद्रपूर जिल्ह्यातील २० बालकांवर नुकतीच मुंबईत नि:शुल्क हृदयरोग शस्त्रक्रिया झाली. सर्व बालकांची प्रकृती उत्तम असल्याचे संस्थेकडून कळविण्यात आले आहे.
१८ जून २०२२ रोजी श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूरद्वारा आयोजित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई येथील फोर्टीज हॉस्पिटलच्या सहकार्याने बालकांसाठी नि:शुल्क हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले होते. शिबिरात तपासणी केल्यानंतर २० बालके हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली. त्या बालकांना त्यांच्या पालकांसह २७ जुलै २०२२ रोजी मुंबईला पाठविण्याचा निर्णय झाला.
मुंबईला जावून येईपर्यंत राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करून दिली. या सर्व बालकांवर फोर्टीज हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली, यावेळी बालकांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.
बालकांना हृदयरोग झाला ही बाब मन हेलावणारी आहे. शिबिरात आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद परत आणता आला, हे महत्वाचे आहे.
सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य व वने मंत्री
शस्त्रक्रिया झालेले बालक
निधी ढोणे (रा. सोनेगाव), क्रिष्णा दहीकर (तळोधी), अधिरा लेनगुरे (चंद्रपूर), समृद्धी मडावी (तुकूम), देवनीश वर्मा (लालपेठ), राहुल झा (दुर्गापूर), देवनीश बुरले (ब्रह्मपुरी), देवनीश नखाते (बरडकिन्ही), हिमांशू निकुरे, आराध्य मुनघाटे (मेहाबुज), सानवी टेकाम (राजोली), निरमय सोनुले (शिवापूर), स्पृहा निमसटकर (गडचांदूर), स्नेही अवथडे (जामगाव), सरगम बागडे (मोहाडी न.) प्रथमेश जरिले (राळेगाव), तनुजा राऊत (नवेगाव), निखिलेश क्षीरसागर (चंद्रपूर), युक्ती कडूकर (सिंदेवाही).