Top News

'घरकुल'साठी ९ हजारांची लाच स्वीकारताना सरपंच जाळ्यात #chandrapur #gadchiroli #arrested


गडचिरोली:- गावातील एका नागरिकाला घरकुल मिळवून देण्यासाठी त्याच्याकडून ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक करण्यात आली. श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार (वय ४६) असे सरपंचाचे नाव आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत ओल्लालवार हा चामोर्शी येथे वास्तव्यास असून विक्रमपूर ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. या ग्रामपंचायतींतर्गत नवग्राम येथील एका नागरिकास घरकुल हवे होते. त्याचे नाव घरकुलाच्या यादीत समाविष्ट करुन घरकुल मिळवून देण्याकरिता सरपंच श्रीकांत ओल्लालवार याने त्यास १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ९ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.
परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने संबंधित नागरिकाने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सापळा रचून सरपंच श्रीकांत ओल्लालवार यास त्याच्याच घरी ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, श्रीधर भोसले, हवालदार नथ्थू धोटे, राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, संदीप उडाण, ज्योत्सना वसाके, तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने