वर्धा:- बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देतो म्हणून तिघांना अठरा लाख रुपयांनी फसविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी नरसिंह रामेश्वर सारसार आर्वी, रजनी अंबादास चौधरी चंद्रपूर, पंकज हरिदास झोडगे अमरावती व अंबादास चौधरी चंद्रपूर यांच्यावर आर्वी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून चौघेही फरार आहेत.
आर्वीच्या रितेश राजेश टाक यास बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन नरसिंह सारसार याने दिले. मात्र त्यासाठी रजनी चौधरी यांना पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगितले. चौधरी वर्ध्यात आल्यावर रितेश हा नरसिंह सोबत त्यांना भेटला. पन्नास हजार रुपये दिल्यावर एक अर्ज भरून घेत दोन फोटोही घेतले. दोन महिन्यानंतर परत रितेशने दोन लाख रुपये दिले. नोकरी बाबत विचारणा केल्यावर सध्या जागा रिक्त नसल्याचे उत्तर त्याला मिळाले. यानंतर आर्वीच्या सावरकर याची साडे आठ लाख रुपयांनी व विरसिंग सारसार याची पाच लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, रितेशला एकदा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. मात्र तिथे गेल्यावर त्याला आरोपीपैकी एकही जण भेटला नाही. अखेर त्यास हा बनवाबनवीचा खेळ असल्याचे व आपला पैसा लुबाडलल्याचे लक्षात आल्यावर रितेशने आर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.