Top News

शांताराम पोटदुखे यांना आदरांजली...... #Chandrapur


तसा नेता होणे आता नाही:- श्रीपाद अपराजित
चंद्रपूर:- सोन्याच्या शिक्यांचा हा प्रदेश होताच, पण सोन्यासारखी माणसे असणाऱ्यांचाही हा प्रदेश आहे असे नमूद करीत सतशील हृदयाचे शांताराम पोटदुखे हे राजकीय जीवनात सदैव प्रतिस्पर्ध्याच्या गुणांचे कौतुक करणारे होते. तसा नेता होणे आता नाही असे गौरवोद्गार 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी येथे बोलताना केले.
येथील सर्वोदय शिक्षण मंडळाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे यांच्या 'चतुर्थ पुण्यस्मरणा' निमित्त शुक्रवारी सायंकाळी आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई शांताराम पोटदुखे या होत्या, तर यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्रीपाद अपराजित पुढे म्हणाले की, शांताराम पोटदुखे यांनी आपल्या समग्र आयुष्यात कधीही राजकीय शत्रुत्व आड येऊ दिले नाही. पण अलीकडे राजकीय क्षेत्रात तसे दिसत नाही. माणसाला माणसाचे दुःख समजले पाहिजे. त्यासाठी कार्य करणे हाच ध्यास त्यांनी घेतला होता.जनमत हा लोकशाहीचा भाग असून ती सदैव जिवंत राहिली पाहिजे. खगोलशास्त्रज्ञ सुभाषजी बापू, बाबुराव मोकाशी अशी सोन्यासारखी माणसे या जिल्ह्याने दिलेली असून त्याची इतिहासात तुरळक नोंद घेण्यात आलेली आहे. वंचित- शोषितांनी निर्माण केलेला इतिहास जिवंत ठेवला पाहिजे. ९० वर्षीय दत्ताजी तन्नीरवार यांच्याकडे इतिहासाची हस्तलिखिते आजही धूळ खात असून इतिहास उजेडात आणणाऱ्या अश्या माणसांना मदत करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले की, शांताराम पोटदुखे यांचा साहित्यक्षेत्रात सक्रीय सहभाग राहिला.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन वेळा चंद्रपुरात यशस्वी करण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्णच होते. जानेवारी १९७९ मध्ये ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले. त्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, तर २०१२ मध्ये ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मेहनत घेत तेही त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यासोबतच विदर्भातील विविध साहित्यविषयक उपक्रमात त्यांचा सातत्याने पुढाकार होता ही बाब लक्षणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. शांताराम पोटदुखे यांच्या नावाने राज्य पातळीवरील पुरस्कार सुरू करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलतांना माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की, शांताराम पोटदुखे यांनी कधिही कोणाशीही शत्रुत्व ठेवले नाही. अजातशत्रू कसा असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शांताराम पोटदुखे हे होते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून बोलताना डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित म्हणाले की, राजकारणातून समाजकारणात जाणारे शांताराम पोटदुखे हे एकमेव असावेत. शांताराम पोटदुखे हे जरी आज नसले तरी मानसिकरित्या, वैचारिकरित्या ते आपल्यात असल्याचे सांगत ते सदैव आपल्या स्मरणात राहतील असे ते म्हणाले.

यावेळी सामाजिक क्षेत्रासाठी मदतीचा हात देणाऱ्या जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठी राजा बोझावार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अजय गुल्हाने व अशोकसिंग ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रकृती अस्वस्थामुळे राजा बोझावार यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र संकेत बोजावार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राजा बोझावार यांची सत्काराला उत्तराची 'ऑडिओ क्लिप' ऐकण्यात आली.

यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर व उपप्राचार्य डॉ.स्वप्निल माध्यमशेट्टीवार,सौ लीना किशोर मामीडवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयेश चक्रवर्ती व डॉ.नियाज शेख, श्रीमती सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे व डॉ. सुभाष गिरडे यांचा उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. यावेळी सरदार पटेल महाविद्यालयातील कर्मचारी प्रशांत मडावी याचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन नासिरखान, तर आभार प्रदर्शन शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यांनी केले.
यावेळी डॉ. पद्मरेखा धनकर यांनी मानपत्राचे वाचन केले.”वैष्णव जन तो तेने कहीए........“ या सांस्कृतिक विभागाच्या चमुने  गायलेल्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी  दिवंगत शांताराम पोटदुखे यांच्या व्यासपीठावरील फोटोला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता डॉ. पद्मरेखा धनकर यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.
या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, सर्वोदय शिक्षण मंडळद्वारे संचालित सर्व महाविद्यालय व शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने