Top News

हातापायाला २४ बोटांचे अर्भक रस्त्याच्या कडेला आढळले #chandrapur #bhadrawati


भद्रावती:- शहरातील जैन मंदिर परिसराच्या मागील बाजूस चंडिका माता परिसरात एक दिवसाचे नवजात अर्भक कडेला ठेवल्याचे आढळून आले.
ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे हा नवजात शिशू मुलगा असून त्याच्या हाताला १२ आणि पायाला १२ असे एकूण २४ बोटे आहेत. अंधश्रद्धेतून त्याला रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आल्याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. पोलिसांनी त्या दिशने तपास चालवला आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी त्या नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्या मातेचा शोध सुरू केला आहे. शहरातील चंडिका माता परिसरातील गॅरेज मालक देवानंद हिवरकर यांना सकाळी ७ वाजताच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्या दिशेने जाऊन बघितले असता कापडात जिवंत नवजात शिशू असल्याचे दिसून आले. दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली.
याबाबत डॉ. नरेश कोठे यांनी भद्रावती पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपानी हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता नवजात शिशूच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या. त्यानंतर भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला दूध पाजण्यात आले. जिवंत अर्भकाला या स्थितीत सोडणारी ती निर्दयी माता कोण, याचा शोध घेण्यासाठी रुग्णालय तसेच परिसरातील माहिती गोळा करणे सुरू केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने