Top News

कोंबडा घेऊन पळालेला बिबट्या पडला विहिरीत #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- कोंबड्यावर ताव मारण्यासाठी बिबट्या पहाटेच्या सुमारास एका घरात घुसला. घर मालक जागा झाल्याने बिबट्या कोंबडा घेऊन पळताना गावातील एका विहिरीत पडला.
वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्या बिबट्याला सकाळी कोंबड्याच्याच मदतीनेचे विहिरीबाहेर काढून जीवनदान दिले. ही घटना शुक्रवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील किटाळी बोदरा या गावात घडली.
ब्रम्हपुरी तालुक्यात अगदी शेवटच्या टोकावर किटाळी (बोदरा) हे गाव वसले आहे. चहूबाजूनी घनदाट जंगल आहे. त्यामुळे या गावातील पाळीव जनावरे बिबट्याचे भक्ष्य बनत आहेत. दिवसाआड बिबट्या गावात येऊन कधी जनावरांची तर कधी कोंबड्यांची शिकार करतात. अशीच एक घटना गावात घडली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास किटाळी बोदरा गावात कोंबड्याची शिकार करण्याकरीता एका घरात बिबट्या घुसला.
पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने कोंबड्याची शिकार करण्याकरीता त्यांचेवर झडप टाकली. कोंबड्याचा आरडाओरडण्याच्या आवाजाने घर मालक जागा झाला. त्यांने बॅटरीने आपल्या घराच्या सभोवती पाहिले असता, बिबट्या आढळून आला. त्याचेवर बॅटरीचा प्रकाश पडताच तो कोंबडा घेऊन पळत सुटला. पळून जाताना तो संतोष मसराम यांच्या घराशेजारील सार्वजनिक विहिरीत पडला. त्या घरमालकाच्या ओरडण्याच्या आवाजाने घराशेजारील नागरिक जागे झाले. विहिरीत गुरगुरण्याचा आवाजाने विहीर परिसरात नागरिकांनीच पहाटेपासून गर्दी व्हायला लागली.
या घटनेची माहिती ब्रम्हपुरी वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे, महेश गायकवाड, क्षेत्र सहायक सय्यद, नागोसे,वनरक्षक प्रधान, मडावी व अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले.
रेस्क्यू करून वाचला बिबट्याचा जीव

रेस्क्यू टीम किटाळी बोदरा गावात पोहचताच रेस्क्यूला सुरूवात करण्यात आली. ज्या कोंबड्यावर ताव मारण्याकरीता बिबट्या विहिरीत पडला. त्याला बाहेर काढण्याकरीता कोंबड्याचा आधार घ्यावा लागला. विहिरीत एक खाट सोडण्यात आला. खाटेवर पिंजरा ठेवण्यात आला.
पिंजऱ्यात एका कोंबड्याला ठेवण्यात आले. त्यानंतर विहिरीत खाटेवरून पिंजरा सोडण्यात आला. विहिरीत पडलेला बिबट्या बाहेर निघण्याकरीता कासावीस करीत असताना पिंजऱ्यात येण्याकरीता घाबरला. मात्र पिंजऱ्यात कोंबडा दिसल्याने शिकार साधण्याकरीता त्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर पिंजरा बाहेर काढण्यात आला. पकडण्यात आलेल्या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेले. दोन ते तीन तासाच्या रेस्क्यू नंतर कोंबड्यावर चटावलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात आल्याने त्याचा जीव वाचला.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने