प्रेयसीला फोन केल्याचा राग अनावर #chandrapur #Nagbhid #attack


प्रियकराने मित्रावर केला चाकू हल्ला


नागभीड:- प्रेयसीला फोन केल्याचा राग अनावर होऊन मित्रानेच मित्रावर चाकू हल्ला केला. या हल्यात एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मिंडाळा येथे मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

मंगळवारी नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे मंडई व नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटक पाहण्यासाठी आरोपीसह चार युवक मिंडाळा येथे एका ओळखीच्या घरी आले. रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी मयूर सुनील दाणी ( रा. खेडमक्ता, ता. ब्रह्मपुरी) या युवकाने रूपेश सिडाम (19, रा. वासाळा मेंढा, ता. नागभीड) या मित्राला फोन करून भेटण्यास बोलावले. रूपेश त्याच गावात नाटक बघण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत आला असल्यामुळे त्यांची भेट मिंडाळा येथे झाली.

यावेळी आरोपी मयुर दाणी याने आपल्या चार मित्रांना सोबत घेऊन माझ्या प्रेयसीला फोन का केला म्हणून रुपेश व त्याच्या मित्रांवर हल्ला केला. नंतर आरोपी मयुर याने रूपेशला बाजूला नेऊन चाकूने पोटावर व छातीवर दोन वार केले आणि आरोपी निघून गेला. दरम्यान, रुपेशसोबत असलेल्या मित्रांनी ही बाब गावात येऊन सांगितली.

गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत असलेल्या रूपेशला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रूपेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले. दरम्यान, नागभीड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून भादंविच्या कलम 307, सहकलम 3(2) (5) अनुसूचित जाती व माती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपी मयुर याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर इतर आरोपींची चौकशी सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत