Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

इन्फंट जिजस स्कूल अत्याचार प्रकरण #chandrapur


सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न


चंद्रपूर:- प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे 29 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

दि. 29 डिसेंबर 2022 रोजी गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इन्फंट जिझस स्कूल प्रकरणी शासनाने मान्य केल्या प्रकारे पुन्हा एक सरकारी अधीयोक्ता (वकील) नियुक्त करण्यात यावा, मंजूर शासकीय वसतिगृहांच्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे अश्या विविध शासन आणि प्रशासन स्तरावरील मागण्या घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.

3 जानेवारी 2023 रोजी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर कडून या मागण्याबाबत चर्चा करण्यासंदर्भात गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला प्राप्त झाले, त्यानुसार आज प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगनंथम एम (भा. प्र. से.) यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

मा. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून दोन दिवसात प्रकल्प कार्यालयाकडून योग्य ती माहिती शिष्टमंडळाला देऊ असे प्रकल्प अधिकारी यांनी स्पष्ट केले. राजुरा येथील इन्फंट जिजस स्कूल प्रकरणी प्रकल्प कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.

इन्फंट जिजस स्कूल राजुरा येथील 2019 मध्ये 17 आदिवासी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने इन्फंट जिजस सोसायटी कडून 4 कोटी रुपये वसुल करण्याचे निर्देश दिल्यानंतरही ते वसुल करण्यात आले नसल्याची खंत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी यांनी व्यक्त केली व इन्फंट जिजस स्कूल ची मान्यता रद्द करण्याची मागणी त्यांनी या बैठकीत केली.

इन्फंट जिजस स्कूल प्रकरणी पुन्हा एक सरकारी वकील नियुक्त करण्यात आला नाही किंवा आमच्या कोणत्याही मागण्यांची दखल प्रकल्प कार्यालयाने घेतली नाही तर कार्यालयासमोरच बेमुदत उपोषण करू असा इशाराही गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या शिष्टमंडळाने यावेळी दिला.

या प्रसंगी पीडित मुलींच्या पालकांसह, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मनोज आत्राम, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी, सामाजिक कार्यकर्ते जितेश कुळमेथे, बिरसा क्रांती दलाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष कुळमेथे, जिवती पंचायत समितीचे माजी सभापती भीमराव मेश्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजे संजीव आत्राम, राजुरा तालुकाध्यक्ष अरुण उदे, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गणपत नैताम, आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष कंटू कोटनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, आकाश गेडाम सह गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत