Top News

अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना #chandrapur #agriculture

विशेष लेख


चंद्रपूर:- राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी, महिला तसेच सर्व समाजघटकांच्या सर्वसामावेशक विकासावर आधारित आहे. विशेष म्हणजे कृषी क्षेत्राला बुस्टर डोज मिळाल्यामुळे या अर्थसंकल्पातून जिल्ह्यातील कृषी आणि संलग्न क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 17 हजार 200 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तर वनाखालील क्षेत्र 5 लक्ष 74 हजार 600 हेक्टर आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 13 हजार हेक्टरवर सिंचनाची सोय असून सर्वसाधारण खरीप क्षेत्र 4 लक्ष 45 हजार 891 हेक्टर, सर्वसाधारण रब्बी क्षेत्र 72901 हेक्टर तर सर्वसाधारण उन्हाळी क्षेत्र 3948 हेक्टर आहे. यावर्षीच्या सर्वसाधारण खरीप हंगामात धानाची लागवड 1 लक्ष 94 हजार 290 हेक्टरवर (40.33 टक्के), कपाशी 1 लक्ष 77 हजार 385 हेक्टर (36.82 टक्के), सोयाबीन 65062 हेक्टर (13.51 टक्के), तूर 33128 हेक्टर (6.88 टक्के), ज्वारी 2224 हेक्टर (0.46 टक्के) तर इतर पिकांची लागवड 9672 हेक्टरवर (2.01 टक्के) झाली आहे. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

नमो शेतकरी महासन्मान निधी : या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार असा 12 हजारांचा सन्माननिधी देण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास 1 कोटी 15 लक्ष शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण 2 लक्ष 82 हजार 158 शेतक-यांची नोंदणी झाली असून आतापर्यंत 2 लक्ष 69 हजार 324 शेतक-यांच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना : या योजनेत शेतकऱ्यांकडून 2 टक्के रक्कम घेतली जात होती. आता केवळ 1 रुपयात पीकविमा काढण्यात येणार आहे. सन 2022-23 अंतर्गत जिल्ह्यातील 51862 धान उत्पादक शेतकरी, 1048 तूर उत्पादक, 9597 सोयाबीन उत्पादक, 4789 कापूस उत्पादक, 23 ज्वारी उत्पादक, 10 मूग उत्पादक आणि 5 उडीद उत्पादक शेतकरी असे एकूण 67334 शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. तसेच पीक विमा अंतर्गत जिल्ह्यातील 8386 शेतक-यांना 6 कोटी 31 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 5872 शेतक-यांना 5 कोटी 24 लक्ष तर हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत 2514 शेतक-यांना 1 कोटी 7 लक्ष रुपये पीक विमा देण्यात आला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान : या योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 2 लाखापर्यंत लाभ देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2018- 19 पासून 2022-23 पर्यंत या योजनेंतर्गत एकूण 889 अर्जदारांनी अर्ज दाखल केले. यापैकी 146 प्रकरणे रद्द, 329 प्रकरणे प्रक्रियेमध्ये असून 414 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर प्रकरणात शेतक-यांना आतापर्यंत 9 कोटी 29 लक्ष रुपयांचे वाटप झाले आहे.

धान उत्पादकांना बोनसचा फायदा : चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. मूल, सावली, सिंदेवाही, , नागभीड, चिमूर, ब्रम्हपुरी या तालुक्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जिल्ह्यात धानाचे सरासरी क्षेत्र 1 लक्ष 63 हजार 648 हेक्टर असून धानाची प्रत्यक्ष पेरणी 1 लक्ष 94 हजार 290 हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी 1 लक्ष 48 हजार 413 आहे. अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार बोनसचा फायदा होणार आहे.

महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना : सन 2021-22 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प आणि राज्य – कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 685 लाभार्थ्यांसाठी 5 कोटी 83 लक्ष रुपये, सन 2022-23 मध्ये 960 लाभार्थ्यांसाठी 9 कोटी 47 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. तर 2023-24 च्या नियोजनामध्ये अंदाजित 1283 लाभार्थ्यांकरीता जवळपास 12 कोटी अनुदान अपेक्षित आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई – सुक्ष्म सिंचन योजना : प्रधानमंत्री कृषी सिंचाई – सुक्ष्म सिंचन योजना ‘पर ड्रॉप, मोर क्रॉप’ अंतर्गत सन 2021 – 22 मध्ये 1811 लाभार्थ्यांना 2 कोटी 66 लक्ष, सन 2022 – 23 मध्ये 1505 शेतक-यांना 2 कोटी 26 लक्ष रुपये महाडीबीटीद्वारे अनुदान देण्यात आले आहे. तर सन 2023-24 च्या नियोजनामध्ये 2435 शेतक-यांसाठी 6 कोटी 58 लक्ष रुपये अनुदान अपेक्षित आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ आणि ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविण्यात येणार आहे.
राजेश येसनकर
जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने