चंद्रपूर:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि बँकेचे विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांनी आपल्या काही समर्थक संचालकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार आणि करण देवतळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे जिल्हा बँकेचे सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले असून, भाजपच्या हातात बँकेची सूत्रे येण्याची शक्यता बळावली आहे.
जवळपास १३ वर्षांनंतर झालेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा भाजपने आपली पूर्ण ताकद लावली होती. पारंपरिकरित्या काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत भाजपला पूर्वीपेक्षा अधिक संचालक निवडून आणण्यात यश आले होते. काँग्रेसनेही आपला गड राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते, परंतु रवींद्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
रवींद्र शिंदे यांचा भाजपमधील प्रवेश हा केवळ त्यांचा वैयक्तिक निर्णय नसून, जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आणण्याच्या रणनीतीतील एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. या पक्षप्रवेशानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचे नियंत्रण असणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. या बदलाचे केवळ बँकेच्या राजकारणावरच नव्हे, तर जिल्ह्याच्या आगामी राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.