नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर:- प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठ पूजन समिती, चंद्रपूरद्वारा आयोजित प्रभू श्रीराम मंदिर अयोध्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यामधून काष्ठ पाठविण्यात येत आहे. त्याकरिता दि. 29 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत काष्ठपूजन शोभायात्रा निघणार आहे. सदर शोभायात्रा ही बल्लारपूर येथील एफ.डी.सी.एम येथून विसापूरमार्गे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय-माता महाकाली मंदिर-गिरनार चौक-गांधी चौक-जटपुरा गेट- प्रियदर्शनी चौक-चांदा क्लब ग्राउंड,चंद्रपूरपर्यंत काढण्यात येणार आहे.
या शोभायात्रेमध्ये वाहतुकीला अडथळा होवु नये म्हणून या मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सदर शोभायात्रा करीता असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहे. त्याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमित केल्या आहे.
दि. 29 मार्च रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत बामणी फाटा, बल्लारपूर ते कामगार चौक, चंद्रपूरपर्यंत जड वाहतूक बंद राहील. या कालावधीमध्ये जड वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. यामध्ये वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडून राजुरा व गडचांदूर जाण्यासाठी पडोली-धानोरा फाटा-भोयेगाव रोडचा अवलंब करावा. गडचांदूर व राजुराकडून वरोरा, भद्रावती व चंद्रपूर येण्यासाठी भोयगाव-धानोरा फाटा-पडोली या मार्गाचा वापर करावा तसेच गोंडपिपरी व कोठारीकडून चंद्रपूर येण्यासाठी पोभुर्णा मार्गाचा वापर करावा.
वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक हा मार्ग 29 मार्च रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. दरम्यानच्या काळात पडोलीकडून शहरांमध्ये जाणारी वाहतूक डॉ. आंबेडकर कॉलेज-जटपुरा गेट या मार्गाचा किंवा सावरकर चौक-बस स्टॉप-प्रियदर्शनी चौक-जटपुरा गेट या मार्गाचा वापर करावा. दिलेल्या निर्देशाचे पालन करून जनतेने पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.