तपास अधिकाऱ्याला आरोपीकडून दहा हजारांची लाच देण्याचे आमिष #chandrapur #bribe


चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

चंद्रपूर:- पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराने चक्क तपास अधिकाऱ्यास न्यायालयाच्या हजर राहण्याच्या अटी व शर्थीपासून सूट देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच देताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.

चंदू रामचंद्र बगले (५७, रा. इंदिरानगर, चंद्रपूर) असे अटकेतील स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे. जिल्ह्यातील अशी पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

तक्रारदार सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. चंदू रामचंद्र बगले याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याचा तपास ते करीत आहेत. बगले यांनी तक्रारदारास सहकार्य करण्यासाठी व न्यायालयातील हजर राहण्याकामी तसेच अटी व शर्थीपासून सूट मिळावी, यासाठी तपास अधिकाऱ्यांस दहा हजार रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखविले. याबाबतची तक्रार सहायक पोलिस निरीक्षकांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच घेण्याचे आमिष दाखवून घेण्यास प्रोत्साहित केल्याचे सिद्ध झाल्याने स्वस्त धान्य दुकानदार चंदू बगले याला अटक करून रामनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक शिल्पा भरडे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गुरूनुले, रमेश दुपारे, अरुण हटवार, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, रवी ढेंगळे, राकेश जांभूळकर, अमोल सिडाम, वैभव गाडगे, मेघा मोहुर्ले, पुष्पा कावळे, सतीश सिडाम आदींनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गुरूनुले यांच्याकडे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या