मोहफुलाच्या पाककृतीचे "ती" महिलांना देते धडे #chandrapur #pombhurna #specialstory

Bhairav Diwase
0

आदिवासींची पाककला शोधून काढण्याचं काम करीत आहे चेक बल्लारपूरची सुश्मिता

लाडू, चिक्की, शरबत, जाम, जेली, केक, गुलाबजाम आदि पदार्थाला मिळत आहे मोठी पसंती


पोंभूर्णा:- आपल्या खाद्यसंस्कृतीत कधी ऐकले नाही असे पदार्थ मोहाची चिक्की, मोहाचे लाडू, मोहाचं सरबत, गुलाबजाम एवढेच नव्हे तर नव्या पिढीला आवडणारे जेली, जाम, केक असे पदार्थ मोहफुलापासून अलिकडे बनविण्यात येत आहेत. आदिवासी खाद्यसंस्कृतीच्या पाककलेचा मागोवा घेत लुप्त झालेल्या आदिवासींची पाककृती शोधून काढण्याचं काम एक युवती मागील दोन वर्षांपासून करीत आहे.



पोषणयुक्त मोहाचे पदार्थ ताटात यावेत. जंगलात असलेल्या वनउपज मोहफुलापासून आदिवासींना अधिक उत्पन्न मिळावे हा उद्देश घेऊन पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूरची सुश्मिता रुषी हेपट हि २४ वर्षीय तरुणी कुरखेड्यात काम करीत आहे. "आम्ही आमच्या आरोग्यासाठी" हि संस्था तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.पोंभूर्ण्यातही ती पंचायत समिती अंतर्गत उमेदच्या बचत गटातील महिलांनाही मोहफुलापासून पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देत आहे.



सुश्मिता आदिवासी बहुल पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर इथल्या शेतकरी कुटुंबातील. बालपणापासून तिला झाडं, वेली, फुले, फळं, पानं याची तीला आवड. गावी जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत नंतर चंद्रपूरला दहावीपर्यंतचं शिक्षण तर बामणी येथील बीआयटीत अन्नतंत्र पदविका. नंतर ती जळगावातील निलॉन्स संस्थेत तिने इंटर्नशीप केली. पुढे अमरावती विद्यापीठात शासकीय महाविद्यालयात केमिकल अँड फुड टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. रासेयो शिबिरादरम्यान मेळघाटातल्या कोरकू समाजाशी सुश्मिताचा जवळचा संबंध आला. कुपोषणाचं प्रमाण या भागात अधिक असल्याने आदिवासी समाजासाठी काही करता येईल या विचाराने ति आदिवासींची पारंपरिक पाककृती शोधून काढण्याचं तिनं निश्चय केला.

सुश्मीताने २०२१ पासून गडचिरोलीतल्या आदिवासी भागात फिरल्यानंतर इथल्या पारंपरिक पोषणमूल्य असलेल्या पाककृती खाद्यसंस्कृतीचं अवलोकन केलं. या भागात मोहाची फुलं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे लक्षात आले. पण त्यांच्या आहारात मोहाचे वापर कमी होत असल्याचे दिसले. मोहापासून बनविलेला चविष्ट लाडू हा सुष्मिताने बनवलेला पहिला पदार्थ. त्यानंतर मोहाची मूळ चव कायम राखत तिने शरबत बनविले नंतर तिने गूळ, शेंगदाणा आणि त्यात मोहफुलं, काही वेळा जवस आणि टरबुजाच्या बिया वापरून तिने चिक्की बनविला. सुश्मिताने बनवलेली मोहाची चिक्की, लाडू, सरबत, बोंडा, गुलाबजाम, जाम, जेली, केक असे अनेक पदार्थ विकले जात आहेत.

सुश्मिता आता आदिवासी महिलांना, बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील पंचायत समिती पोंभूर्णा अंतर्गत उमेदच्या बचत गटांनाही मोहफुलापासून विविध पदार्थ तयार करण्याचे ती प्रशिक्षण देत आहे.

मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. गडचिरोली आणि परिसरातल्या जंगलात आदिवासींसाठी हा वृक्ष वरदान. मोहाची फुलं, फळं, बिया, पानं, सालं, फांद्या, मुळं या सर्वांचा वापर होत असल्याने हे झाड म्हणजे आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)