Top News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे chandrapur #NCP


जाणून घ्या चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी 'लोक माझा सांगाती'या पुस्तकाचे विमोचन करतांना अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणा केली. या घोषणेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामे देण्याचे सत्र सुरू झाले असून, चंद्रपूर जिल्ह्यातही मुख्य पदाधिकाऱ्यांनी पदाचा त्याग करीत प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे कडे राजीनामे पाठविल्याने राजीनामा सत्र चर्चेत आले आहे. आधी पवारांचा नंतर जिल्ह्यातील पक्ष प्रमुखांच्या राजीनाम्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरदचंद्र पवार यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्यासह कार्यकारिणीने राजीनामा देत साहेबांनी निर्णय मागे घेतला तरच पुढे काम करू अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांची आहे. मंगळवारी मुंबईत पुस्तकाचे प्रकाशन करताना शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली.


कमिटी स्थापन करून निर्णय घ्यायला हवा

भारतीय राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची महत्वाची भूमिका असते. प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेण्याचा त्यांच्या भूमिकेमुळे हा पक्ष मोठा झाला. केंद्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये. एक समिती स्थापन करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. या पावलामूळे पक्षाचे मोठे नुकसान होईल. त्यांनी राजीनामा परत घ्यावा.
ऍड.बाबासाहेब वासाडे
जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.


देशातील कार्यकर्ते दुखावले

पवार साहेबांच्या निर्णयाचा आम्हाला धक्का बसला. त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्यात आयुष्य जात आहे. त्यांचा राजीनामा मन हेलावणारी घटना आहे. या निर्णयामुळे अख्या देशातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच नाही तर साहेबांवर प्रेम करणारी जनता दुखावली आहे. कार्यकर्त्यांचा मान राखण्यासाठी त्यांनी राजीनामा परत घ्यावा म्हणून मी पण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. जो पर्यंत पवार साहेब निर्णय मागे घेत नाही,तो पर्यंत राजीनामा कायम राहील.
राजेंद्र वैद्य
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
चंद्रपूर.


मन सुन्न करणारा निर्णय

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंबनिवृत्त होण्याचा निर्णय मन सुन्न करणारा आहे.कार्यकर्त्यांना सुचेनासे झाले आहे.
त्यांनी हा निर्णय परत घेतला पाहिजे. नव्यापिढीला त्यांचे कडून अपेक्षा आहे.राजीनाम्याचा त्यांचा निर्णय मान्य करणे अवघड आहे. निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीच आम्ही करू शकतो.
राजीव कक्कड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर शहर.

वेदनादायक निर्णय

आजच्या राजकीय परिस्थितीत देशाला आणि महाराष्ट्राला आपली अत्यंत गरज आहे. आपण शेतकऱ्याचे जाणते राजे आहात. महिलांचे उद्धारक शेतकरी कष्टकरी, दलीत, आदिवासी, अल्पसंख्यांकांचे आधारवड आहात. आमच्या सारख्या महिला तरुण तरुणींना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. पक्ष अध्यक्ष पदाचा निर्णय माझ्या सारख्या कार्यकर्तीसाठी अतिशय वेदनादायक आहे. माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा.
बेबी उईके
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस चंद्रपूर.

.....तर मग राजीनामा स्टंट कशाला?
राजीनामा मंजूर होणार नाही म्हणून राजीनामा दिला नाही. पवार साहेबांचा हा निर्णय अनपेक्षित होता. आमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार व शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असे आहे. त्यांनी हा निर्णय मागे घ्यायला हवा. पक्षश्रेष्ठींनी राजीनामे मंजूर होणार नाही, हे आधीच स्पष्ट केले, तर मग राजीनामा स्टंट कशाला.. ?
नितीन भटारकर
प्रदेश कार्याध्यक्ष
राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने