भद्रावती:- प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत भद्रावती नगर पालिका क्षेत्रातून तयार होणाऱ्या नागमंदीर चौक ते विंजासन-देऊरवाडा रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे,अशी मागणी भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे दि.१२ जून रोजी केली.
नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मद्रावती नगर परिषद क्षेत्रामधून प्रधानमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत नागमंदीर चौक ते विंजासन-देऊरवाडा या रस्त्याचे बांधकाम मंजूर असून, या रस्त्याचे काम नागमंदीर चौक ते विंजासनपर्यंत मधोमध ४ मिटर रुंद व अंदाजे १.५ फूट उंच असे अर्धवट रस्त्याचे बांधकाम केलेले आहे. ४ मिटर रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजुला अंदाजे १.५ मिटर जागेवर पेव्हिंग ब्लॉक लावण्यात येणार असून, ते पेव्हिंग ब्लॉक अजूनपावेतो लावलेले नाहीत. हा रस्ता विजासन, देऊरवाड़ा, चारगांव, कुनाडा कोलमाईन्स तसेच विंजासन पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाणारा हा एकमेव मार्ग आहे. हे काम सुरु होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, अर्धवट ४ मिटर रुंद रस्त्याचे काम पूर्ण होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. परंतु अजूनपावेतो या रस्त्याच्या दोन्ही बाजुंची पेव्हिंग ब्लॉक लावण्याची साईड न भरल्याने व अप्रोच रस्ते न जोडल्यामुळे या अरुंद रस्त्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांची वाहने सत्याच्या खाली उतरुन मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
या होणाऱ्या अपघातांचा रोष नागरिकांकडून नगर परिषदेवर व्यक्त केला जात आहे. नागमंदीर चौक ते विंजासन पावेतो रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट वसाहत असल्याने नागरीकांची ये - जा तसेच विंजासन, देऊरवाडा, चारगांव, कुनाडा कोलमाईन्स व विंजासन पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ लक्षात घेता हे काम त्वरित पूर्ण करुन देण्यात यावे, अशीही विनंती धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करताना न.प.उपाध्यक्ष संतोष आमने आणि माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपस्थित होते.