मुधोली येथे तीन दिवसीय प्रयास शिबीर संपन्न

Bhairav Diwase
0

भद्रावती:- शालेय विद्यार्थ्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी पुढे काय करायचे? याबाबत मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीकोनातून तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या सरस्वती विद्यालय मुधोली येथे तीन दिवसीय निवासी स्वरुपातील जिल्हा स्तरीय प्रयास शिबीर नुकतेच संपन्न झाले.

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा शाखा चंद्रपूर व सर्व तालुका शाखा आणि ग्राम शाखा मुधोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रयास शिबिराचे उद्घाटन मुधोलीचे सरपंच बंडु नन्नावरे यांच्या अध्यक्षतेखाली माना जमात शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपूरचे उपाध्यक्ष श्रावण नन्नावरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे सचिव सुरेश श्रीरामे, संचालक प्रा.विश्वनाथ राजनहिरे, गुणवंत दडमल, विद्यार्थी संघटनेचे मुख्य सल्लागार हरिदास श्रीरामे, शंकर भरडे, राज्य अध्यक्ष राहुल दडमल, ग्राम पंचायत सदस्य सोमेश्वर पेंदाम, एकनाथ बावणे, माजी सरपंच केशव जांभुळे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
तीन दिवसीय प्रयास शिबीराच्या पहिल्या दिवशी संघटना सल्लागार शंकर भरडे व प्रा.स्वानंद ढोक यांनी वेगवेगळ्या कौशल्यपूर्ण स्वरूपात सहभागी विद्यार्थी परिचय, गटनिर्मिती व शिबीराची नियमावली याबाबत मांडणी केली. ॲड.वैभव पंडित यवतमाळ यांनी कायदा सल्लागार क्षेत्रातील विविध संधी, आशिष नन्नावरे यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधील प्रवेश प्रक्रिया व महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी नेचर फाउंडेशनचे निलेश नन्नावरे यांनी केजी टु पीजी आणि करिअर संधी, टाटा ट्रस्टचे सूरज साळुंखे यांनी कॅन्सरचे प्रकार व कारणे आणि प्रतिबंधक उपाय, विजय मुसळे चंद्रपूर यांनी शिक्षण, प्रशासन, व्यवसायातील करिअर संधी व आव्हाने, पप्पू देशमुख चंद्रपूर यांनी तरुण नेतृत्वाची समाज विकासातील भूमिका, उपायुक्त अभय नन्नावरे आय.आर.एस. यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी व तंत्र, मॅजिक फाउंडेशनचे श्रीकांत एकुडे यांनी स्पर्धा परिक्षेचे महत्व, त्यासाठी लागणारे संसाधन आणि मॅजिक फाउंडेशनचे उपक्रम, संघटनेचे मुख्य सल्लागार यांनी संघटनेची वाटचाल आणि आदिवासी माना जमातीची संस्कृती या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी संघटनेची गरज व येणारी आव्हाणे आणि पुढील नियोजनाचे पर्याय सामुदायिक गटचर्चा घेण्यात आली. यात संघटनेचे सल्लागार, सक्रिय कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी व सहभागी शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला. त्यानंतर समारोपिय कार्यक्रमाने प्रयास शिबिराची सांगता करण्यात आली.
या शिबिरात भद्रावती, वरोरा, चिमूर, सिंदेवाही व इतर तालुक्यातील वर्ग ८ ते १२ वी पर्यंतच्या एकुण २२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात मुलींची संख्या सर्वाधिक होती हे विशेष. यात अनेक सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष शिबिराला भेटी देऊन शिबिरार्थींचे मनोबल वाढविले.
हे प्रयास शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे मुख्य सल्लागार रविंद्र कारमेंगे व राज्य शाखेतील पदाधिकारी कुलदिप श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शाखा, तालुका शाखा व ग्राम शाखांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यासोबतच स्थानिक स्तरावरील व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुधोली येथील सरपंच बंडु नन्नावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान राणे, समिर शेख, कार्तिक राणे, महादेव धारणे व कोंढेगाव, मुधोली ग्राम शाखेतील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)