पदवी प्रवेशाचे स्वप्न भंगले! अपघातात मामा-भाचीचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #accident

Bhairav Diwase

गडचिरोली:- पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेशासाठी एटापल्ली येथे दुचाकीने जात असताना वेलमागड जवळ झाडाला धडक बसल्याने मामा व भाचीचा मृत्यू झाला. नथ्थू पुस्सु हिचामी (२५, रा.जीवनगट्टा) असे मामाचे तर रोशनी बंडू पदा (२२, रा. पिपली बुर्गी) असे भाचीचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नथ्थू हिचामी हा कामानिमित्त बहिणीच्या घरी पिपली (बुर्गी) गावात गेला होता. तो आपल्या गावी जीवनगट्टा येथे परत येण्याकरिता निघाला. नथ्थूची चुलत भाची रोशनी हिला एटापल्ली येथील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे ती एटापल्लीपर्यंत येण्यासाठी नथ्थूच्या दुचाकीवर बसली.

हेही वाचा… मावशीने लोटले मुलीला देहव्यापारात


पिपली (बुर्गी) गावाजवळून चार किमी अंतरावर वेलमागड गावाजवळ दुचाकीची झाडाला धडक बसली. या अपघातात नथ्थूचा जागीच मृत्यू झाला. रोशनी गंभीर जखमी झाली. तिला पिपली (बुर्गी) गावात नेल्यानंतर तिचाही काही वेळाने मृत्यू झाला. नथ्थूचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेतीची कामे करायचा. रोशनी बारावी उत्तीर्ण झाली होती. तिला पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र हे स्वप्न अपूर्णच राहिले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.