पोंभूर्णा:-तालुक्यातील जामखुर्द ग्रामपंचायत येथे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सक्षमीकरणासाठी गावातील विधवा महिलांना वर्षभर कामाची व्यवस्था करून देत महिला सक्षमीकरणाचे मोठे पाऊल उचलले गेले आहेत.तालुक्यात जामखुर्द ग्रामपंचायतने एक आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे यशस्वी पाऊल ग्रामपंचायतीने उचलले आहे.रोजगार हमीच्या कामामुळे बाराही विधवा महिलांच्या हाताला काम मिळाला असल्याने त्या आत्मनिर्भर जीवन जगत आहेत.त्याच्यावर अवलंबून असलेल्यांचेही जीवन समृद्ध होण्यास मदत होत आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द ग्रामपंचायतने विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.गावातील विधवा,घटस्फोटीता यांचे आयुष्य फार खाचखडग्याने भरलेले असते.त्यांची प्रचंड परवड होत असते.कुणी कमावता नसल्याने परिस्थितीमुळे आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या व अशा परिस्थितीत मुलांचीच नव्हे तर आईवडिलांचा,सासुसासऱ्यांचा सांभाळ करतांना मोठे हाल अपेष्टा सहन करावे लागते.मुला बाळाच्या शिक्षणाचा प्रश्न हि प्रमुख समस्या असते.
त्यामुळे जामखुर्द ग्रामपंचायतने अश्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसणाऱ्या या महिलांचे स्वतः पालकत्व स्वीकारून त्यांच्या कामासाठी ठराव घेऊन अश्या महिलांना वर्षभर कामाची तजवीज करून ठेवली.शासनाच्या वतीने सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामावर त्यांना बारमाही रोजगाराची व्यवस्था करून ठेवली आहे.या महिला मागील पाच वर्षांपासून रोजंदारीवर रोहयोचे काम करून आपलं व आपल्या कुटुंबाचं भरणपोषण स्वाभिमानाने करीत आहेत.
विधवा, घटस्फोटीत महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ग्रामपंचायतने पालकत्व स्विकारून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.रोहयो अंतर्गत असलेल्या कामावर त्यांना वर्षभर काम देण्याची व्यवस्था केली आहे.आज विधवा व घटस्फोटीत १२ महिलांना बारमाही रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे.
धनराज बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत जामखुर्द
दहा वर्षापूर्वी कपाळावरचा कुंकू पुसल्या गेलं.तीन मुली, वृद्ध सासरा,व हलाखीची परिस्थिती सोबतीला होती.ग्रामपंचायतने माझी परिस्थिती बघून माझे पालकत्व स्विकारून बारामाही काम मिळेल यासाठी पुढाकार घेतला.मागील पाच वर्षांपासून रोहयोच्या रोजंदारीवर मी बारमाही काम करीत आहे.माझ्या तीनही मुलींना मी शिकवली असून एक मुलगी ग्रॅज्युएशन,एक मुलगी नर्सिंग करीत आहे.तर एका मुलीचं लग्न करून दिलं आहे.रोहयोने दिलेलं रोजगार व ग्रामपंचायतच्या पालकत्वाने मी स्वावलंबी जीवन जगू शकत आहे.
इंदुबाई गेडाम, जामखुर्द