आधी समस्या सोडवा, मगच जमिनी ताब्यात घ्या #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आधी समस्या सोडवा, मगच आमच्या जमिनी ताब्यात घ्या अशी मागणी भद्रावती तालुक्यातील डिप्पान डेनरो प्रकल्पाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या एम.आय.डी.सी.प्रकल्पग्रस्तांनी एका निवेदनाद्वारे येथील तहसीलदारांकडे केली आहे.

२५ वर्षांपूर्वी तालुक्यातील ढोरवासा, तेलवासा, पिपरी, विंजासन,गवराळा भागातील शेतजमिनी तत्कालीन निप्पान डेनरो या ऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. मात्र या जागेवर अद्याप एकही उद्योग सुरू करण्यात आला नाही. दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकरी या अधिग्रहीत जमिनी वाहून त्या माध्यमातून आपली उपजीविका करीत आहेत. मात्र आठ दिवस अगोदर एमआयडीसी ने या जागेवर फलक लावून शेतात पेरण्या करू नये असा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष उत्पन्न झाला आहे. त्यामुळे कंपनीने आधी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून व त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यानंतरच या जमिनी ताब्यात घ्याव्यात यासाठी प्रकल्पग्रस्तांतर्फे येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. २५ वर्षांपासून या जागेवर कोणताही उद्योग उभारण्यात न आल्याने येथील शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपापल्या शेतामध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र एमआयडीसीने या जागेवर फलक लावून शेतकऱ्यांना या जागेवर पिके न घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी संतप्त झाले आहे. आधी या सर्व प्रकल्पग्रस्तांशी प्रस्तावित कंपनीने संवाद साधावा, जमिनीचा वाढीव मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, प्रकल्पग्रस्तांना येणाऱ्या उद्योगात शिक्षणाानुसार नोकरी द्यावी, सर्व गावांचे पुनर्वसन करावे, शेतात उभे असलेले खरीपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येईपर्यंत जमिनी ताब्यात घेऊ नये, शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या आधी मार्गी लावण्यात याव्या व त्यानंतरच जमिनीत ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)