रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड #chandrapur


चंद्रपूर:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, एल.आय.सी. वरोरा, एलिव्हेट फायनान्स लिमि., व्हि.व्हि.आर. फायनान्स आदी कंपन्या सहभागी होत्या. या रोजगार मेळाव्यात 379 महिला उमेदवारांची उपस्थिती होती, त्यापैकी 95 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सुधा पोटदुखे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, अॅड. प्रिया पाटील आदींची उपस्थिती होती.

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, कौशल्याचा वापर रोजगार व स्वयंरोजगार मिळवण्यासाठी करावा, उमेदवारांनी नवउद्योजक बनावे तसेच या ठिकाणी आलेल्या उद्योजकांनी जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी द्यावी. यासोबतच महिला उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अॅड. प्रिया पाटील म्हणाल्या, स्त्रियांनी चुल व मूल या संकल्पनेत गुंतून न राहता उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, रोजगार मेळाव्यातून संधीचा लाभ घ्यावा व महिला उद्योजक म्हणून नावारुपास यावे.

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे म्हणाले, या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून उमेदवारांना रोजगाराची संधी चालून आली आहे. या संधीचा लाभ घ्यावा तसेच उमेदवारांनी आपल्या कौशल्याचा वापर रोजगार मिळवण्यासाठी करावा व नोकरीसाठी बाहेर जाण्याची मानसिकता ठेवावी असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका कविता रायपूरकर तर आभार मुकेश मुजंनकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या