Top News

आ. वडेट्टीवारांनी आयत्या बिळावर नागोबा बनू नये #chandrapur #bramhapuri


उड्डाण पुलाच्या बांधकामाला आमचे पूर्ण समर्थन. पंरतु पुलावरून होत असलेल्या वडेट्टीवारांच्या राजकारणाला विरोध

माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची आ. वडेट्टीवारांवर टीका
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रह्मपुरी:- ब्रह्मपुरी येथे ब्रह्मपुरी आरमोरी रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी सरकारच्या माध्यमातून 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु आता या विकास कामाला राजकारणाची दिशा प्राप्त झाली आहे. ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला विश्वासात न घेता व्यक्तिगत स्वार्थासाठी हा भूमिपूजन सोहळा उरकण्याचा प्रयत्न चालविला आहे. याबाबत ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी विजय वडेट्टीवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. वडेट्टीवारांनी आयत्या बिळावर नागोबा बनू नये अशी टीका भाजपचे नेते माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी पत्रकार परिषदेत वडेट्टीवारांवर केली आहे.

🧑‍✈️
सदर कामाच्या भूमिपूजनाची माहिती पालकमंत्री, खासदार व क्षेत्रातील विधान परिषद सदस्यांसोबतच प्रशासनाला न देता. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी हा कार्यक्रम वडेट्टीवार उरकत असल्याचे उघड झाले. या भूमिपूजन समारंभाचा आम्ही निषेध करतो असेही यावेळी माजी आमदार अतुल देशकर यांनी सांगितले. उड्डाण पुलाच्या निर्माणा करिता भारतीय जनता पार्टीचे पूर्ण समर्थन असल्याचे यावेळी माजी आमदार देशकर यांनी स्पष्ट केले.

एन एच ३५३ डी वरील या पुलाच्या बांधकामा करिता प्रशासकीय मान्यता २०२१ साली प्राप्त झाली. सर्व तांत्रिक बाबी व प्रक्रिया पार पडत ऑगस्ट २०२३ च्या शेवटी या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली. परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यतिगत पत्रिका छापत, गावात बॅनर पोस्टर लावून हा कार्यक्रम उरकण्याचा केविलवाणा प्रयत्न वडेट्टीवार करत असल्याचे माजी आमदार देशकर या वेळी म्हणाले. या पत्रिकेत अधिकाऱ्यांच्या नावाचा दुरुपयोग सुद्धा वडेट्टीवार यांनी केला असल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत देशकर यांनी केला. सुरुवातीला कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभीड यांच्या नावे पत्रिका छापण्यात आली परंतु प्रकरण अंगावर येत असल्याचे लक्षात येताच वडेट्टीवार यांनी कोणाच्याही नावाचा उपयोग न करता नव्याने पत्रिका छापल्या असल्याचे समोर आले. या सर्व बाबी बघता वडेट्टीवार जनतेची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होते.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना, या अशासकीय कार्यक्रमात जे शासकीय अधिकारी सहभागी होतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू असा इशार देशकर यांनी प्रशासनाला दिला. या सोबतच खासदार अशोक नेते यांनी सदर भूमिपूजन सोहळा शासकीय नियम व शिष्टासारानुसार स्थगित करावा अशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे मागणी केली असल्याचे ही माजी देशकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्य सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, माजी पं.स सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष अशोक प्रा. सालोटकर, बाजार समितीचे संचालक प्रा. यशवंत आंबोरकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुयोग बाळबुधे, जिल्हा सचिव तनय देशकर, महामंत्री ज्ञानेश्वर दिवटे, विक्रम कावळे, शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें, पंकज माकडे, अमित रोकडे, तळोधीचे सरपंच अनिल तिजारे, मुई चे उपसरपंच उमेश घुले यांच्या सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने