मुंबई:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले आहे. आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत, तर काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोटदेखील लागले असून जाळपोळीच्या घटना घडत आहेत.
मागील २ दिवसांत मराठवाड्यात ३ तहसीलदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या. सोमवारी बीडच्या माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करतानाच संतप्त मराठा आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषदही पेटवून दिली.
मराठा उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलनाची दिशा भरकटल्याचा दावा केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीने हिंसाचार करू नये. शांततेत आंदोलन करावे. हिंसाचार करणारे कोण आहेत याचा शोध घ्यायला हवा. सत्ताधारी पक्षाचे नेतेच आपल्या कार्यकर्त्यांना जाळपोळ करायला लावून आंदोलनाला बदनाम करत असावेत, असा संशय मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.
जाळपोळीच्या घटना समोर आल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आक्रमक मराठा आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. हे कोण करतंय? ही थोडी शंका आहे, पण मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला जाहीर आवाहन आहे की पुढील २ दिवस मला कुठेही जाळपोळ केल्याची किंवा नेत्याच्या घरी गेल्याची बातमी आलेली नकोय. नाही तर मला उद्या संध्याकाळी वेगळा निर्णय घ्यावा लागेल. हे सामान्य मराठे दिसत नाहीत. हे बहुतेक सत्ताधार्यांचीच माणसे दिसत आहेत. आपल्याला कोणाच्या घरी जायचे नाही. जाळपोळ बंद करा. मग तु्म्ही आपल्या समाजाचे असाल किंवा सत्ताधार्यांचे कार्यकर्ते असाल, जाळपोळ बंद करा. आपल्याला शांततेने गोरगरीब समाजाला न्याय द्यायचा आहे, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.
अर्धवट आरक्षण घेणार नाही
ज्यांच्याकडे कुणबी वंशावळी असतील किंवा तत्सम पुरावे असतील त्यांना लगोलग कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर दिले, परंतु पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार असल्याचे सांगत सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत, असा पुनरुच्चार करत अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
बहुतेक सत्ताधार्यातीलच लोकं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची घरे जाळून घेत असल्याचा अंदाज आहे. मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला ते डाग लावत आहेत ही माझी शंका १०० टक्के खरी निघणार आहे. मी याबाबत शोध लावायला लावतो. कारण यांना विनाकारण हे आंदोलन चिघळायचे आहे, पण हे आंदोलन चिघळू शकत नाही. सामान्य मराठे शांततेत आंदोलन करत आहेत.
-मनोज जरांगे-पाटील
मराठा आंदोलनाची दिशा भरकटली आहे. मराठा समाजातील नेते आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनाच गावबंदी करणे हे राज्याच्या हिताचे नाही. समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, याची दखल मराठा समाजाने आणि मराठा नेत्यांनी घेतली पाहिजे आणि सरकारला वेळ दिला पाहिजे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक
काही दिवसांपूर्वी एका मराठा तरुणाने माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना फोन करत त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. या चर्चेत मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेली मुदत संपूनही राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने तुम्ही भूमिका स्पष्ट करा, अशी विनंती केली होती. त्यावर जरांगेंनी ग्रामपंचायत निवडणूक तरी लढवली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संतप्त मराठा तरुणांनी सोमवारी सकाळी प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक सुरू केली. सुमारे तासभर ही दगडफेक सुरू होती. सोळंके यांच्या वाहनांची तोडफोड करून आंदोलकांनी वाहने पेटवूनही दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत