तरुण झाले व्यसनाधीन; ठाणेदाराच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह?

Bhairav Diwase
0
शहरात ही वस्तू येते कुठून?


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना 
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात सध्या गांजा विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजरोसपणे विक्री होत असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. याठिकाणी अंमली पदार्थांची विक्री सुद्धा होत असल्याची माहिती असून इतर अंमली पदार्थांच्या तुलनेत गांजा सहज उपलब्ध होत असल्याने तरूणाईला गांजाच्या नशेची चटक लागली आहे. शहरात गांजा विक्रेते कोण? याची माहिती पोलिसांना नसावी, हे पचणी पडत नाही. गांजा विकणारे यांना सापडत नाही की, पकडायचेच नाही, हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.
   गडचांदूर शहरातील शिवाजी चौक,संविधान चौक आणि काही आलीशान पान शॉपीवर रात्री उशिरापर्यंत काही तरूण एका कोपऱ्यात बसून गांजा ओळत असल्याचे बोलले जात आहे.पहिले सिगारेट घेऊन त्यातील तंबाखू काढले जाते,नंतर त्या रिकाम्या रिगारेटच्या पुंगळीत सोबत आणलेला गांजा भरून त्याच पान शॉपी मधून 'गोगो पाईप' घेऊन बिनधास्त सिगारेट ओढतात,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.त्याबरोबर रेल्वे स्टेशन व इतर निर्जीव ठिकाणी दिवसा व रात्रीच्या सुमारास काही तरूण गांजा भरलेली सिगारेट ओढत असल्याची सुद्धा माहिती आहे.

गांजाची नशा करणाऱ्या तरुणांच्या चौकशीतून विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळणे अवघड नाही.गांजा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता असेल तर,पोलिसांसाठी हे केवळ 4 दिवसांचे काम आहे.मात्र असे होताना दिसत नाही.? थेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन यांना गांजा पुरवणाऱ्या तस्करांपर्यंत पोहोचता येते. तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यास गांजा विक्री रोखणे शक्य होणार आहे.मात्र विक्रेत्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी सुरू असून यामुळे ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.गांजा विक्रेत्यांना अभय देण्यापेक्षा त्यांच्यावर कायद्याची दहशत निर्माण करून पोलिसांनी तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे,अन्यथा भविष्यात गडचांदूरचा 'उडता पंजाब' होण्यास वेळ लागणार नाही,हे मात्र नक्की.तरुणाईला या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी थेट गांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे गरजेची असताना ठाणेदार आता यासंदर्भातील कारवाईला केव्हा सुरुवात करणार,हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)