गडचिरोली:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे भेट देऊन स्थानिक आदिवासी व पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर रात्री भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिनेश पुसू गावडे (२७, रा. लाहेरी ता. भामरागड) असे मृत तरुणाचे नाव असून तो विवाहित होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या पेनगुंडा गावात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रुपेश हा लाहेरीवरून १५ नोव्हेंबररोजी पेनगुंडा येथे गेला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास संशयित नक्षलवाद्यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. प्रथमदर्शनी त्याच्या चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण असून हत्येनंतर घटनास्थळी एक पत्रक आढळून आले आहे. त्यात दिनेश हा पोलीस खबरी असल्याचे नमूद आहे. पोलिसांनी मात्र तो खबरी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातून नक्षलवादी हद्दपार झाल्याचे म्हटले होते. परंतु त्याच दिवशी रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. धोडराज पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून मृत तरुणाचा मृतदेह आज गुरुवारी सकाळच्या सुमारास शवविच्छेदनसाठी भामरागड येथे नेण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस तपासानंतर दिनेशची हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली हे स्पष्ट होईल, असे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.