Top News

आदिवासी तरुण होणार पायलट:- ना. मुनगंटीवार #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.


एखाद्याला व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) म्हणून परवाना प्राप्त करायचा असेल तर जवळपास 50 लाख रुपये खर्च येतो. पण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या गरीब तरुणाला वैमानिक व्हायचे असेल आणि कमर्शियल पायलटचा परवाना घ्यायचा असेल तर त्यांचे 48 लक्ष रुपये भरण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी तरुणांसाठी 50 टक्के आरक्षणही देण्यात आले आहे. आदिवासी तरुण जेव्हा वैमानिक होऊन आकाशात उंच उडेल, तेव्हा जिल्ह्यासह देशाचाही गौरव वाढणार आहे,' अशी भावना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.


चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या 12 फुट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरपूरचे गोंड राजे केशवशहा आत्राम, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे, प्रमोद कडू, अशोक तुमराम, ब्रिजभूषण पाझारे, अल्का आत्राम, धनराज कोवे, चंद्रकला सोयाम, नामदेव डाहुळे, आशीष देवतळे, माया उईके, शीतल आत्राम, शीतल कुळमेथे, गंगूबाई मडावी, शुभम गेडाम, किशोर आत्राम, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, विक्की मेश्राम, विजय पेंदोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


मी अर्थमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाचा निर्णय केला. दुर्गम भागात आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिला आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी गावांना पायाभूत सुविधांसाठी निधीच मिळत नसताना मी अर्थसंकल्पात 350 कोटी रुपयांची तरतूद केली आणि 2895 आदिवासी गावांना हा निधी थेट पोहोचवला. याचा फायदा तेथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झाला. तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीचे 72 कोटी रुपये आदिवासींना बोनसच्या रुपात देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला, याचा मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने