भावाला ओवाळणीसाठी जाणाऱ्या बहिणीचा मृत्यू #chandrapur #wardha #death #accidentवर्धा:- दिवाळी आटोपल्यानंतर आता भाऊबीजेनिमित्त भावाला ओवाळण्यासाठी जात असलेल्या बहिणीच्या कारचा अपघात होऊन बहिणीची करुण अंत झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दिंदोडाजवळील टाकळी (किटे) शिवारात घडली. या अपघात पती आणि दोन चिमुकले थोडक्यात बचावली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मी प्रशांत माकोडे रा. चंद्रपूर असे मृत बहिणीचे नाव आहे. त्याच पती प्रशांत वसंत माकोडे (४०), मुलगा पार्थ (९) व अथर्व (७) यांच्यासोबतच एम.एच.३४ व्ही.आर.५७४० क्रमाकाच्या कारने चंद्रपूर येथून सेलुला भावाकडे जात होत्या. सेलुपासून १२ किलोमीटर अंतरावर टाकळी (किटे) जवळील वळण रस्त्यावर कार अनियंत्रित होऊन पलटी झाले. यात रश्मीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर कारचालक प्रशांत माकोडे यांच्यासह पार्थ आणि अथर्व यांना किरकोळ मारला लागला. या घटनेने सेलू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सेवाग्राम रुग्णालयात शवविच्छेदन करुन तिचे पार्थिव सर्वप्रथम सेलूला माहेरी नेण्यात आले. याठिकाणी माहेरच्या कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर पार्थिव चंद्रपुरला सासरी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.


...अन् माहेरी मुलीचे पार्थिवच आले!


दरवर्षीप्रमाणे भावाला ओवाळण्याकरिता रश्मी आपल्या परिवारासोबत सेलूला माहेरी येत होती. भावाला ओवाळण्याकरिता बहिण आणि जावाई येत असल्याने सेलू येथील माहेरची मंडळीही आनंदात होती. पाहुणे कधी पोहोचेल म्हणून माहेरची मंडळी सातत्याने रश्मीसोबत संपर्कात होते. सेलूपासून अवघ्या काही अंतरावरच असल्याने रश्मी माहेरच्यांना फोन करुन बोलत होती. आम्ही अर्ध्या तासांत पोहोचतो, अशी सांगत होती. त्यामुळे माहेरीही तयारी सुरु झाली होती. पण, काळाने झडप घालून रश्मीला हिरावून घेतल्याने माहेरी मुलगी नाही तर तिचे पार्थिवच पोहोचले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत