क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा विचार पुढे नेणे काळाची गरज:- ना. सुधीर मुनगंटीवार #chandrapur

Bhairav Diwase
0

भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

चंद्रपूर:- क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे व्यक्तिमत्त्व वाघानेही हेवा करावा असे होते. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना अभिमानाने उर भरून आला आहे. पण एवढ्यावर थांबता येणार नाही. भगवान बिरसा मुंडा यांनी स्वराज्याचा संकल्प केला होता, आपल्याला हा संकल्प सुराज्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी त्यांचा विचार पुढे नेणे ही काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या १२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर तसेच आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिरपूरचे गोंड राजे केशवशहा आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,प्रमोद कडू, अशोक तुमराम, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजपा प्रदेश महिला महामंत्री अल्का आत्राम, धनराज कोवे, चंद्रकला सोयाम, नामदेव डाहुळे, आशीष देवतळे, मायाताई उईके, शितल आत्राम, शितल कुळमेथे, गंगूबाई मडावी, शुभम गेडाम, किशोर आत्राम, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, विक्की मेश्राम, विजय पेंदोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आज समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशापुढे जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे आव्हान आहेच, मात्र त्यासोबत विचार प्रदूषणाचेही मोठे आव्हान आहे. २१व्या शतकात तंत्रज्ञानाने आयुष्य बदलले, पण मानसिक स्वास्थ बिघडले हे खरे आव्हान आहे. त्यावर मात करायची असेल तर मी वाईट वागणार नाही, मी प्रामाणिकपणे आयुष्य जगेन, दुसऱ्याची रेष पुसणार नाही स्वतःची रेष मोठी करेन, असा संकल्प करावा लागेल. हा संकल्प करण्याची प्रेरणा बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून मिळणार आहे.’कर्तृत्व दाखवायचे असेल, अन्यायाविरुद्ध एल्गार करायचा असेल तर वय आडवे येत नाही, याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा आहेत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘१५ नोव्हेंबर १८७५ ला त्यांचा जन्म झाला आणि अवघे २५ वर्षांचे आयुष्य ते जगले. त्यातही त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. १९४२ ला भारत छोडो आंदोलन झाले, पण खरा एल्गार बिरसा मुंडा यांनी केला. ‘अंग्रेजो अपने देश वापस जाओ… हमारा देश हमारा राज’ अशी गर्जना त्यांनी दिली. भारतीयांच्या मनात त्यांनी हा भाव पोहोचवला,’ असे ते म्हणाले.

समाजासाठी बलिदान देण्याची भगवान बिरसा मुंडा यांची वृत्ती आदर्श असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान बिरसा मुंडा यांना शिकायचे होते. त्यांच्यात शिक्षण घेण्याची जिद्द होती. त्यावेळी जर्मन मिशनरी शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागला. पण दुर्दैवाने या शाळेने सर्वांत मोठी अट ठेवली ती म्हणजे धर्मांतरण करण्याची. बिरसा मुंडा यांनी काही महिन्यांसाठी धर्मांतरण केलेही. पण एक दिवस शाळेतील एका शिक्षिकेने जेव्हा त्यांच्या समाजासाठी अपशब्द वापरले तेव्हा बिरसा मुंडा उठले आणि त्यांनी एल्गार केला. शाळेतून बाहेर पडताना त्यांनी जबरदस्तीने लागलेला धर्मही सोडला. आज विविध देश भारताच्या प्रगतीकडे वक्रदृष्टी ठेवून आहेत. त्यांच्या संघटना भारतात विषारी विचार पसरवत आहेत. पण बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेत आपण सावध राहिले पाहिजे.’ यावेळी त्यांनी अशोक तुमराम व त्यांच्या संपूर्ण टीमचे पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी अभिनंदन केले.

आदिवासी समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत

आदिवासी समाजाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, हे मी माझे भाग्य समजतो. पण २००५ मध्ये आदिवासींच्या आरक्षणावर मी विधीमंडळात चर्चा उपस्थित केली. तेव्हा माझ्याविरोधात मोर्चा निघाला. कारण मी आदिवासी समाजाची बाजू घेतली होती. ज्या समाजाने वनामध्ये, पर्यावरणामध्ये देव बघितला, त्या समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत असताना कोणतीच ताकत माझे काहीच बिघडवू शकत नाही, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

तीच खरी आदरांजली ठरेल

आदिवासी तरुणांना संधी दिली तर ते कधीही मागे राहणार नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक देणगीचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी समाजातील तरुणांना साथ देण्याचे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला केले. ज्यावेळी आपण आदिवासी समाजातील इंकम टॅक्स भरणाऱ्या शंभर तरुणांचा सत्कार याच ठिकाणी करू ती खरी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली असेल आणि तोच खरा लोकार्पण सोहळा असेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ‘हजारो मंजिल का सफर हम पुरा कर सकते है… एक कदम आगे चलना होगा…’ या ओळींच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आवाहन केले.

आदिवासींची प्रगती थांबवू शकत नाही

अशोक तुमराम यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दुःखद घटना घडली. त्यांच्या धर्मपत्नी जमुना तुमराम यांचे निधन झाले. अशोक तुमराम यांनी आपले दुःख काही क्षण बाजुला ठेवून समाजासाठी इथे उपस्थित झाले. समाजासाठी झटणारे असे लोक असतील तर आदिवासी समाजाची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आदिवासी समाजासाठी…

मी अर्थमंत्री झाल्यानंतर श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाचा निर्णय केला. दुर्गम भागात आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिला आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी गावांना पायाभूत सुविधांसाठी निधीच मिळत नसताना मी अर्थसंकल्पात साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद केली आणि २ हजार ८९५ आदिवासी गावांना हा निधी थेट पोहोचवला. याचा फायदा तेथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झाला. तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीचे ७२ कोटी रुपये आदिवासींना बोनसच्या रुपात देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला, याचा ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

आदिवासी तरुण होणार पायलट

चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.‘एखाद्याला व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) म्हणून परवाना प्राप्त करायचा असेल तर जवळपास ५० लाख रुपये खर्च येतो. पण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या गरीब तरुणाला वैमानिक व्हायचे असेल आणि कमर्शियल पायलटचा परवाना घ्यायचा असेल तर त्यांचे ४८ लक्ष रुपये भरण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी तरुणांसाठी ५० टक्के आरक्षणही देण्यात आले आहे. आदिवासी तरुण जेव्हा वैमानिक होऊन आकाशात उंच उडेल, तेव्हा जिल्ह्यासह देशाचाही गौरव वाढणार आहे,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने स्टेडियम

मी मंत्री नसतानाही केंद्राकडे पाठपुरावा करून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने डाक तिकीट काढले. आता त्यांच्या नावाने एक भव्य स्टेडियम चंद्रपुरात होणार आहे. २५ कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. पण विदर्भातील सर्वांत उत्तम स्टेडियम उभारण्यासाठी अतिरिक्त निधीला मंजुरी मिळवून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. २०३६च्या अॉलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू घडविण्याचे काम या स्टेडियमच्या माध्यमातून होईल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

तीनशे आदिवासी मुलींसाठी वसतिगृह

आपण एकाच ठिकाणी नव्हे तर जील्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी वसतिगृहांना मान्यता घेतली. चंद्रपूरचे वसतीगृह बांधून तयार आहे. पोंभूर्णा आणि सावलीलाही आदिवासी मुलामुलींचे वसतीगृह होणार आहे. बल्लारपुरजवळील ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र कौशल्य विकासाला प्राधान्य देणार आहे. आणि याठिकाणी दरवर्षी तिनशे आदिवासी मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता ३०० मुलींचे वसतीगृह करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)